'या' राज्यात आतापर्यंत तब्बल 23 आमदारांना कोरोनाची लागण, खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 09:28 PM2020-08-26T21:28:59+5:302020-08-26T21:34:57+5:30
"23 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात मंत्र्यांचाही समावेश आहे. जर आमदार आणि मंत्र्यांची ही स्थिती असेल, तर स्थानिक पातळीवरील परिस्थिती किती गंभीर असेल, याचा अंदाज सहजपणे लावला जाऊ शकतो."
चंदिगड - पंजाबमध्ये आतापर्यंत तब्बल 23 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, राज्यातील कोरोना स्थितीवर चर्चा करताना ही माहिती दिली.
अमरिंदर सिंग म्हणाले, ''पंजाब विधानसभेचे अधिवेश सुरू होण्यास आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. 23 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात मंत्र्यांचाही समावेश आहे. जर आमदार आणि मंत्र्यांची ही स्थिती असेल, तर स्थानिक पातळीवरील परिस्थिती किती गंभीर असेल, याचा अंदाज सहजपणे लावला जाऊ शकतो. त्यामुळे परीक्षांसाठी ही वेळ आणि परिस्थिती योग्य नाही.''
आज काँग्रेसच्या हंगामी अधक्ष सोनिया गांधी यांनी जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षांसंदर्भात भाजपाचे सरकार नसलेल्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. याच वेळी अमरिंदर सिंग यांनी नीट-जेईईची परीक्षा घेण्याला विरोध दर्शवला.
या बैठकीत अमरिंदर सिंग आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, या परीक्षा रोखण्यासाठी राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात जायला हवे, असेही म्हटले आहे. मात्र, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी, न्यायालयात जाण्यापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून, या परीक्षा रद्द करण्याची मागणी करायला हवी, असे म्हटले आहे.
मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा -
या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भाग घेतला होता. यावेळी कोरोनाविरुद्ध लढाईची चर्चा होत असताना ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. तुम्ही करोना संसर्गाशी खूपच चांगल्या पद्धतीने लढत आहात, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तेव्हा, त्यांचे आभार मानत 'मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे,' असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात लढायचे की त्यांना घाबरून राहायचे हे आधी ठरवले पाहिजे, असे मतही उद्धव ठाकरे यांनी या बैठिकीत मांडले.
शाळा सुरू करण्यासंदर्भात काय म्हणाले उद्धव ठाकरे -
सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीत कोरोनासह शाळेच्या प्रश्नावरही चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्याबाबत चिंता व्यक्त केली. अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे शाळा सुरू केल्यानंतर आपल्याकडेदेखील अमेरिकेसारखी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या -
आता अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांत पसरला कोरोना, हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकही क्वारंटाइन
खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा
CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात
ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात