भाजपवाले जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं म्हणतात आणि आम्हाला घाबरतात; केजरीवालांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 06:01 PM2022-03-24T18:01:40+5:302022-03-24T18:02:10+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत भाषण करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला.
नवी दिल्ली-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत भाषण करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. "काल शहीद दिनी आम्ही शहीदांना आदरांजली वाहिली. आम्ही सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा आदर करतो, पण त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये लावण्याचा निर्णय घेत. आम्ही घोषणा केल्यापासून खूप टीका होत आहे. भाजपवाले म्हणाले सावरकर आणि हेडगेवारांची प्रतिमा का नाही? आम्ही म्हणालो तुम्ही लावा की. तर इंदिरा आणि सोनिया गांधी का नाहीत, असं काँग्रेसवाले म्हणत आहेत, आम्ही त्यांनाही तेच म्हणालो", असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग का? याचं कारण आम्ही सांगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवलं, त्यांची स्वप्नं आम्ही पूर्ण करत आहोत, मात्र भाजपवाल्यांना महापालिकेच्या निवडणुका नको आहेत, ते निवडणुका पुढे ढकलत आहेत. त्यांच्या भ्रष्टाचारावर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची बैठक सुरू आहे. कालच एका नेत्यानं सांगितलं की, मी माझ्या भाजप नेत्यांना निवडणुकीची भानगडच संपवायला सांगितली आहे असं म्हटलं. NDMC प्रमाणे उमेदवारी द्या. निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर करणार होतं, पण पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि तारीख पुढे ढकलली गेली. त्यांना पराभवाच्या भीतीनं निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना आंबेडकरांचा द्वेष आहे", असा हल्लाबोल अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत केला. ते म्हणाले की, "अशा प्रकारे हे लोक उद्या गुजरातमध्ये निवडणूकच नको म्हणून प्रयत्न करतील, मग देशात निवडणुका होऊ नयेत यासाठीही पावलं उचलली जातील. पण मला म्हणायचं आहे की उद्या आपण असू किंवा नसू, भाजप जिंको किंवा आम आदमी पार्टी. मात्र देश आणि लोकशाही कायम राहणार आहे हे लक्षात घ्यायला हवं"
अरविंद केजरीवालांनी यावेळी भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याच्या दाव्यावरही हल्लाबोल केला. "भाजपावाले म्हणतात की ते जगातील सर्वात मोठा आमचा पक्ष आहेत. आम्ही तर सर्वात छोटा पक्ष आहोत, तरीही तुम्ही आम्हाला इतके का घाबरता? निवडणूक जिंकून दाखवा. 'बंटी और बबली' हा चित्रपट होता, या चित्रपटात एक सीन आहे की लोक 'आमच्या मागण्या पूर्ण झाल्या'च्या घोषणा देत घरासमोर आले, पण मागणी काय आहे ते कळत नव्हतं", असं केजरीवाल म्हणाले. "मी भाजपाच्या समर्थकांना आजही सांगू इच्छितो की, ही आंधळी वाटचाल सोडा, आम आदमी पक्षात सामील व्हा, आम्ही तुम्हाला सन्मान देऊ. काल उपराज्यपाल म्हणाले की दिल्लीचा जीडीपी 5 वर्षांत 50% वाढला आहे आणि कोणत्याही राज्यामध्ये वाढ झाली नाही, मी उपराज्यपालांच्या अभिभाषणाचे आभार मानतो", असंही केजरीवाल म्हणाले.