CoronaVirus News: कोरोनामुळे २६ वर्षांचा डॉक्टर मुलगा गमावला; वडिलांचे शब्द ऐकून मुख्यमंत्रीही थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 10:11 AM2021-05-24T10:11:32+5:302021-05-24T10:14:03+5:30
CoronaVirus News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृत डॉक्टरच्या वडिलांकडे सुपूर्द केला १ कोटी रुपयांचा धनादेश
नवी दिल्ली: कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात ४२० डॉक्टरांनी जीव गमावला आहे. यातील १०० डॉक्टर दिल्लीतील आहेत. कोरोना जीवावर बेतत असतानाही डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या कर्तव्यापासून जराही विचलित झालेले नाहीत. रुग्णसेवेचा त्यांचा निश्चय कायम आहे. त्यापासून ते तसूभरही मागे हटलेले नाहीत. दिल्लीतल्या एका तरुण डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू झाला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेले. त्यावेळी डॉक्टरांच्या वडिलांचे शब्द ऐकून मुख्यमंत्रीही थक्क झाले.
जगात कोरोना पसरण्याआधी चीनच्या 'त्या' लॅबमध्ये काय घडलं?; धक्कादायक माहिती उघड
डॉ. अनस मुजाहिद यांचा काही दिवसांपूर्वीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते दिल्लीतल्या जीटीबी रुग्णालयात सेवा देत होते. कोरोनाचं निदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनस यांचा जीव गेला. अनस यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुख्यमंत्री केजरीवालांनी १ कोटी रुपयांचा धनादेश दिला. त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी अनसच्या वडिलांचे शब्द ऐकून केजरीवाल थक्क झाले. 'माझा मुलगा अनस ९ मे रोजी हे जग सोडून गेला. लोकांची सेवा करता करता त्याचं निधन झालं. त्याच्या निधनाचं दु:ख खूप मोठं आहे. पण तो देशाच्या कामी आला याचं समाधान आहे. माझी दोन मुलं इंजिनीयर आहेत. एक मुलगी बीएमएसच्या पहिल्या वर्षाला आहे. अनसप्रमाणेच माझी सगळी मुलं, माझं संपूर्ण कुटुंब देशाच्या कामी येवो,' अशा भावना अनसच्या वडिलांनी व्यक्त केल्या.
तुम्ही 'या' तीन गोष्टी करता? मग तुम्हाला 'ब्लॅक फंगस'चा अधिक धोका
अनसच्या वडिलांचे शब्द ऐकून अरविंद केजरीवालदेखील गहिवरले. अनसच्या वडिलांच्या विचारांना त्यांनी सलाम केला. 'डॉ. अनस यांचं वय जाण्याचं नव्हतं. पण आपला तरुण मुलगा गमावूनही त्याच्या वडिलांचे विचार अतिशय कौतुकास्पद आहेत. अवघ्या २६ व्या वर्षी अनस त्यांना सोडून गेला. त्याचं लग्नही झालं नव्हतं. त्याच्या मृत्यूला १० दिवस झालेत. पण तरीही त्याचे वडील माझं संपूर्ण कुटुंब देशाच्या कामी यावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत. मी त्यांना मनापासून सलाम करतो,' असं केजरीवाल म्हणाले.