“आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था, PM मोदींनी...”; KCR यांचा केजरीवालांना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 06:04 PM2023-05-27T18:04:39+5:302023-05-27T18:06:53+5:30
Arvind Kejriwal And K Chandrashekar Rao Meet: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केसीआर यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर करताना मोदी सरकारवर टीका केली.
Arvind Kejriwal And K Chandrashekar Rao Meet: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांना एकत्रित करण्यासाठी आणि विरोधकांची मोठी फळी उभारण्याचा प्रयत्न केला जात असताना, दुसरीकडे केंद्र सरकारने काढलेल्या एका अध्यादेशासंदर्भात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत. यातच अरविंद केजरीवाल यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. यावेळी केसीआर यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर केला.
अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुंबईत येऊन शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी तेलंगणची राजधानी हैदराबाद येथे जाऊन केसीआर यांची भेट घेतली. यावेळी बोलताना केसीआर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था
पंतप्रधान मोदींनी अध्यादेश मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. हा काळ आणीबाणीच्या दिवसांपेक्षाही वाईट आहे, केंद्रातील मोदी सरकार जनतेने निवडून दिलेल्या सरकारला काम करू देत नाही. केंद्र सरकार बिगर भाजपशासित सरकारना काम करू देत नाही. आम आदमी पार्टी दिल्लीत खूप लोकप्रिय आहे, असे केसीआर यांनी स्पष्ट केले. तसेच नरेंद्र मोदींनी हा अध्यादेश मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. आम्ही सर्व अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देतो. मोदी सरकारने दिल्लीतील जनतेचा अपमान केला आहे. हा जनादेशाचा अपमान आहे. केंद्राने अध्यादेश मागे घ्यावा, अन्यथा आम्ही एकजुटीने लढा देऊ, असा एल्गार केसीआर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, दिल्लीत आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने लगेचच दिल्ली सरकारच्या अधिकारावर नियंत्रण आणणारा अध्यादेश काढला. याविरोधात गेली ८ वर्ष आम्ही लढलो. सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला. मात्र, लगेचच परंतु या निर्णयानंतर अवघ्या आठच दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढून आमचे अधिकार हिरावले. हा दिल्लीकरांवर मोठा अन्याय होत आहे. पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत तर जनतेला न्याय मिळणार कुठे, असे देशातील जनता म्हणत आहे. पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानत नाहीत. अध्यादेश आणून कायदा मोडीत काढतात. अशा प्रकारे देशाचा कारभार करणे चुकीचे आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.