यमुनेच्या पाण्यासंदर्भात CM आतिशी यांनी केली होती तक्रार, EC नं थेट हरियाणाकडून मागवला अहवाल! नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:36 IST2025-01-27T18:36:05+5:302025-01-27T18:36:49+5:30
...यानंतर, निवडणूक आयोगानेही मुख्यमंत्री आतिशी यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.

यमुनेच्या पाण्यासंदर्भात CM आतिशी यांनी केली होती तक्रार, EC नं थेट हरियाणाकडून मागवला अहवाल! नेमकं प्रकरण काय?
Delhi Assembly Election 2025: सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून राजकारण तापताना दिसत आहे. नेते मंडळींचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता विधानसभा निवडणुकीचा हा रणसंग्राम यमुनेच्या पाण्यावर येऊन ठेपला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून हरियाणातील भाजप सरकारने यमुनेचे पाणी प्रदूषित केल्याचा आरोप केला होता. यानंतर, निवडणूक आयोगानेही मुख्यमंत्री आतिशी यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.
यासंदर्भात, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "दिल्ली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून एक निवेदन प्राप्त झाले आहे. यात, हरियाणामधून दिल्लीला मिळणाऱ्या पाण्यात अमोनियाचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयोगाने हरियाणा सरकारला उद्या (२८ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत या संदर्भात तथ्यात्मक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
सीएम आतिशी यांनी केला होता आरोप -
खरेतर, आम आदमी पक्षाने भाजपवर दिल्लीतील पाणीपुरवठ्यात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी दावा केला की, हरियाणातील भाजप सरकार जाणूनबुजून कारखान्यांचे प्रदूषण यमुनेत टाकत आहे. यामुळे यमुनेत अमोनियाचे प्रमाण वाढले आहे. तसेच, दिल्लीतील तीन मोठे प्रक्रिया प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचेही आतिशी यांनी म्हेटले आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
हरियाणा सरकार वर केजरीवालांचा आरोप -
सीएम आतिशी यांच्याशिवाय माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हरियाणा सरकारवर आरोप केला होता. ते म्हणाले होते, "यमुनेचे पाणी हरियाणातून दिल्लीत येते. तेथील भाजप सरकारने यात विष मिसळले. दिल्ली जल बोर्ड सावध होते, जर ते सावध नसते तर अनेकांचा जीव जाऊ शकला असता. हे अराजकता निर्माण करण्यासाठी केले गेले. निवडणूक आयोगाने यात हस्तक्षेप करायला हवा."
काय म्हणाले हरियाणाचे मुख्यमंत्री -
यानंतर, आम आदमी पक्षाच्या आरोपांवर हरियाणा सरकारची प्रतिक्रियाही आली आहे. यासंदर्भात बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले, आरोप करून पळून जाणे, ही अरविंद केजरीवाल यांची सवय आहे. केजरीवाल यांनी यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांना हे शक्य झाले नही. मी क्वालिटी चेक करण्यासंदर्भात बोललो होतो.