६ वर्षापूर्वी घटस्फोट झालेले मुख्यमंत्री मान आईच्या आग्रहास्तव करणार दुसरं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 09:51 AM2022-07-07T09:51:59+5:302022-07-07T09:52:52+5:30
पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
बलवंत तक्षक
चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी पुन्हा बोहल्यावर चढतील. चंदीगडच्या सेक्टर आठमधील गुरुद्वारात आयोजित साध्या सोहळ्यात ते हरियाणाच्या डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत लग्न करणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे अनेक नेते विवाह सोहळ्याला उपस्थित राहतील. मान ४८ वर्षांचे असून, आईच्या आग्रहामुळे ते दुसरा विवाह करत आहेत. मान व त्यांच्या पहिल्या पत्नी इंदरप्रीत कौर यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.
पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांचा मुलगा आणि मुलगी अमेरिकेवरून पंजाबला आले होते. मात्र, इंदरप्रीत कौर शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हत्या.
का घेतला घटस्फोट?
राजकारणात आल्यानंतर मान यांना कुटुंबाला वेळ देणे कठीण झाले होते. त्यामुळे इंदरप्रीत त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या होत्या. घटस्फोटानंतर आता सगळा पंजाबच आपले कुटुंब असल्याचे मान यांनी म्हटले होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वडिंग यांनी विवाहासाठी मान यांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाजमाध्यमांवरही मान यांच्यावर त्यांच्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.