केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला २ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता; ठाकरेंना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 07:33 AM2022-07-19T07:33:43+5:302022-07-19T07:35:04+5:30

२० जुलैला सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आमदारांच्या अपात्रेबद्दल सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे. 

CM Eknath Shinde group likely to get 2 minister posts in Union Cabinet; setback Shiv Sena Chief Uddhav Thackeray | केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला २ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता; ठाकरेंना धक्का

केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला २ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता; ठाकरेंना धक्का

googlenewsNext

नवी दिल्ली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. आमदारांपाठोपाठ आता खासदारांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदार वेगळा गट बनवून शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. लोकसभेतील या गटाचं नेतृत्व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे करणार असून याबाबत आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देणार असल्याची माहिती आहे. 

शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांच्या वेगळ्या गटासाठी मुख्य प्रतोद म्हणून यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे गटातील खासदारांना केंद्र सरकारमध्ये २ मंत्रिपदे मिळण्याचीही शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत असून समर्थक खासदारांसह ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 
शिंदे गटातील खासदारांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री पद मिळावं अशी मागणी करण्यात येत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रातील कॅबिनेट विस्ताराबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर निर्णय घेण्यात येईल. २० जुलैला सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आमदारांच्या अपात्रेबद्दल सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यात भाजपाशी जुळवून घ्यावं अशी मागणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भावना गवळी यांना मुख्य प्रतोद या पदावरून काढलं. त्यानंतर त्या शिंदे गटात सहभागी झाल्या. तर शिंदे गटात सहभागी होणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत म्हणाले की, लोकसभेत शिवसेना खासदार एकत्र आहेत. ज्याप्रमाणे आमदारांवर अपात्रेसाठी कारवाई केली गेली त्याप्रमाणे जर खासदार कुणी फुटला तर त्यांच्यावर कारवाई होईल. आम्ही कायदेशीर लढा देत आहोत. राजन विचारे यांना मुख्य प्रतोद नेमलं आहे असंही त्यांनी सांगितले. 

Web Title: CM Eknath Shinde group likely to get 2 minister posts in Union Cabinet; setback Shiv Sena Chief Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.