Eknath Shinde On Uddhav Thackeray: इथे मुंबईत उद्धव ठाकरेंचे आरोप, लगेचच एकनाथ शिंदेंचे दिल्लीतून प्रत्युत्तर; संघर्ष शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 10:16 PM2022-09-21T22:16:35+5:302022-09-21T22:17:19+5:30

Eknath Shinde On Uddhav Thackeray: माझ्याशिवाय चांगला हिशेब कुणाकडे असणार. सगळे सांगणार, पण दिल्लीतून नाही महाराष्ट्रात येऊन, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला.

cm eknath shinde replied from delhi to shiv sena chief uddhav thackeray criticism in mumbai melava | Eknath Shinde On Uddhav Thackeray: इथे मुंबईत उद्धव ठाकरेंचे आरोप, लगेचच एकनाथ शिंदेंचे दिल्लीतून प्रत्युत्तर; संघर्ष शिगेला

Eknath Shinde On Uddhav Thackeray: इथे मुंबईत उद्धव ठाकरेंचे आरोप, लगेचच एकनाथ शिंदेंचे दिल्लीतून प्रत्युत्तर; संघर्ष शिगेला

Next

Eknath Shinde: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील गोरेगाव येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याला जाहीररित्या संबोधित केले. यावेळी शिंदे गट आणि भाजपवर खास ठाकरे शैलीत तोफ डागली. मात्र, उद्धव ठाकरे यांचे संबोधन संपते न् संपते तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना थेट दिल्लीतून प्रत्युत्तर दिले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदनात आयोजित एका सभेला संबोधित करत होते. यावेळी शिंदे यांनी बंडामागचे कारण आणि तत्कालीन परिस्थितीचा पुनरुच्चार करत उद्धव ठाकरे यांनी केलेले वार तत्काळ पलटवून लावले. अडीच वर्षानंतर गटप्रमुखांची आठवण आली का, असा रोकडा सवाल एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना केला. 

आम्ही मिंधे गट नाही तर बाळासाहेबांचे खंदे समर्थक 

आम्हाला मिंधे गट म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे खंदे समर्थक आहोत. दोन्ही काँग्रेससोबत तुम्ही सत्तेसाठी मिंधेपणा केला. आम्हाला आस्मान दाखवणार म्हणालात, तीन महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला आस्मान दाखवले आहे. आम्हाला मिरचीचा ठेचा देणार, अहो आम्ही ठेचा खाऊनच मोठे झालो, म्हणूनच आम्ही त्यांना ठेचले आहे. महाविकास आघाडीला खाली खेचणे शक्य नव्हते. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, मग आम्ही तुम्हाला बापाचे विचार चोरणारी टोळी म्हणायचे का?, असा खोचक सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. 

माझ्याशिवाय चांगला हिशेब कुणाकडे असणार

ये पब्लिक है सब जानती है, गद्दार कोण खुद्दार कोण? जनता जाणते. आरोप प्रत्यारोप करत राहू द्या, दोन्ही काँग्रेससोबत तुम्ही गेलात म्हणून जनतेने तुम्हाला नाकारले आहे. मुख्यमंत्री झाल्यावर एका तरी गट प्रमुखाला रोजगार मिळाला का? त्यांना मुंबईत येणे-जाणेही परवडत नव्हते. कधी त्यांचा  विचार केला का? मी नगरविकास खात्यातून १-२ कोटी निधी दिला आणि काम करा म्हणून सांगितले. मी देण्याचे काम करतो, काही जण फक्त घेण्याचे काम करतात. मी देनेवाला आहे म्हणून मी मुख्यमंत्री बनलो. आता आम्हाला ‘खोके’ बोलत आहात, वेळ आल्यावर सगळे सांगेन.  माझ्याशिवाय चांगला हिशेब कुणाकडे असणार, ते मी दिल्लीत नाही महाराष्ट्रात सांगणार, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे. 

दरम्यान, शिवसेनेत २०-२० वर्षे विविध राज्यांत शिवसैनिक काम करत होते, मात्र त्यांना पक्ष नेतृत्वाची साधी भेटही मिळत नव्हती, त्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे कार्य केले आहे. अडीच वर्षांत आमचा मुख्यमंत्री असूनही आमच्या शिवसैनिकांवर तडीपारी, जेल मिळत होत्या. मी शक्य तितके मदत करत राहिलो. ज्यांची जबाबदारी होती, ते मदत करत नव्हते. आमचा नेता मुख्यमंत्री पदावर असतानाही आमच्याच लोकांवर अन्याय होत होता, अन्यायाची परिसीमा गाठली गेली. त्यामुळे आम्ही उठाव केला. आम्ही जर चुकीची भूमिका घेतली असती तर लाखो लोक आमच्या मागे उभे राहिले नसते, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

 

Web Title: cm eknath shinde replied from delhi to shiv sena chief uddhav thackeray criticism in mumbai melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.