'केंद्रात अडाणी लोकांची जमात बसलीय...", अर्थसंकल्प रोखल्याच्या मुद्द्यावरुन CM केजरीवाल संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:57 PM2023-03-21T18:57:33+5:302023-03-21T18:58:46+5:30
दिल्लीचा अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
नवी दिल्ली-
दिल्लीचा अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "आज दिल्लीच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर होऊ शकला नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहित होते तेव्हा त्यांनी याचा विचारही केला नसेल की केंद्र सरकार अशाप्रकारे राज्य सरकारला रोखू शकेल. देशाच्या संविधानावरच हल्ला केला जात आहे", असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
नियामानुसार राज्यपाल फक्त शिक्कामोर्तब करण्याचं काम करत असतात ते काही आक्षेप किंवा स्वत:चं निरीक्षण देऊ शकत नाहीत. राज्यपाल जर अशाप्रकारे फाइलवर शेरा देत असतील तर ते संविधानाच्या विरोधात आहे, असंही केजरीवाल म्हणाले.
अहंकारानं केंद्र सरकारनं बजेट रोखलं
केजरीवाल म्हणाले की, अर्थसंकल्प रोखणं यात फक्त केंद्र सरकार आणि राज्यपालांचा अहंकार होता. याशिवाय दुसरं कोणतंच कारण यामागे नव्हतं. आम्ही त्याच्यासमोर झुकावं एवढंच त्याचं म्हणणं आहे. पण आम्ही जनतेच्या भल्यासाठी तुमच्यासमोर झुकण्यासही तयार आहोत, असं केजरीवाल म्हणाले.
केंद्रात अडाणी लोकांची जमात
केजरीवाल यांनी संतापाच्या भरात केंद्रातील नेत्यांचा अडाणी असा उल्लेख केला. "तुम्ही जरा शिकलेल्या लोकांना तिथं बसवा. ज्यांच्यात बजेटचा अर्थ समजून घेण्याची क्षमता असेल. भाजपाकडे अडाणी लोकांचा साठा आहे. यांच्याकडे अडाणी लोकांची एक जमात आहे ज्यांना व्यवस्थित बजेट वाचता देखील येत नाही", असं केजरीवाल म्हणाले.