पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोना लस मोफत मिळणार; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा
By देवेश फडके | Published: January 10, 2021 12:39 PM2021-01-10T12:39:11+5:302021-01-10T12:44:09+5:30
पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती महत्त्वाची मानली जात आहे.
कोलकाता :पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (रविवारी) केली. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आल्यानंतर आता १६ जानेवारी २०२१ पासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे.
आगामी कालावधीत पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी केलेली घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम बंगालमधील जनतेला कोरोनाची लस मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. आगामी आठवड्यातील गुरुवारपासून पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे. १४ जानेवारी २०२१ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
I am happy to announce that our government is making arrangements to facilitate the administration of #COVID19 vaccine to all the people of the state without any cost: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/I2Y9DvbHeo
— ANI (@ANI) January 10, 2021
ही घोषणा करताना मला आनंद होत आहे की, पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य सरकार व्यवस्था करत आहे. कोरोना लसीसाठी पश्चिम बंगालच्या जनतेला कोणताही खर्च येणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे. आगामी एप्रिल-मे या कालावधीत २९४ सदस्य असलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९ हजार ९२२ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांत नव्या ९७८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ५९ हजार ८८६ झाली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७९ टक्क्यांवर गेले आहे. तसेच आतापर्यंत ५ लाख ४१ हजार ९३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात कोरोना लसीकरणाची १६ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारीवर्गाला कोरोनाची लस दिली जाईल. त्यानंतर ५० पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेचे आतापर्यंत विविध स्तरातील ६ लाखांहून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.