...अन् मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी चक्क वॉशिंग मशीनच स्टेजवर आणली; पाहा काय केलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:54 PM2023-03-30T12:54:55+5:302023-03-30T12:55:29+5:30
गेल्या २ दिवसांपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलनास बसल्या आहेत.
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा राज्यातील तापमान वाढवले आहे. केंद्र सरकारकडून विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात तपास यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी भाजपावर लावला आहे. आपला आरोप लोकांना पटावा म्हणून ममता बॅनर्जी यांनी थेट वॉशिंग मशिनच जाहीर व्यासपीठावर आणली.
ममता बॅनर्जी यांनी या मशिनला भाजपा वॉशिंग मशीन नाव दिले. इतकेच नाही तर या मशिनचा लाईव्ह डेमोही देत मशिनद्वारे काळा कपडा सफेद कसा होतो हे दाखवले. विरोधी पक्षातील नेत्यांना सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास दिला जातो. परंतु हेच नेते जेव्हा भाजपात सामील होतात तेव्हा ते भोळे आणि निर्दोष होतात असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
गेल्या २ दिवसांपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलनास बसल्या आहेत. केंद्र सरकार पश्चिम बंगालला दुजाभावाची वागणूक देतेय असा आरोप त्यांनी केला. त्याचसोबत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपाविरोधात टक्कर देत त्यांना सत्तेतून हटवण्याचं आवाहन बॅनर्जी यांनी केले.
ममता बॅनर्जी यांनी टीएमसी नेते अनुब्रत मंडल यांच्या अटकेचा उल्लेख करत केंद्र सरकारकडून तपास यंत्रणाना हाताशी धरत विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करतेय जेणेकरून ते निवडणुकीत टीएमसीचं काम करू नये असा आरोपही बॅनर्जींनी केला. प्राणी तस्करीसाठी ईडीने टीएमसी अध्यक्ष अनुब्रत मंडल यांना अटक केली आहे. भ्रष्ट नेते भाजपात सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावरील आरोप स्वच्छ होतात. ममता बॅनर्जी या व्यासपीठावर वॉशिंग मशिनमध्ये काळे कपडे टाकत होत्या आणि त्यातून सफेद कापड बाहेर काढत होत्या. ही भाजपाच्या वॉशिंग मशिनची जादू आहे असा आरोप त्यांनी डेमो देताना केला.
https://publish.twitter.com/?query=https%3A%2F%2Ftwitter.com%2FAITCofficial%2Fstatus%2F1641047217464315905&widget=Tweet
दरम्यान, गरज पडल्यास दिल्लीत जाऊन पंतप्रधान कार्यालयासमोरही धरणे धरणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. लोक मला विचारतात की मी राज्य सरकारच्या वतीने निषेध करते की टीएमसीच्या वतीने. त्यावर मी माझ्या पक्षाच्या वतीने निषेध करत आहे असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.