नितीश कुमारांचा JDU पक्षातच राजकीय 'सर्जिकल स्ट्राईक'; बिहारच्या राजकारणात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 04:50 PM2024-08-24T16:50:47+5:302024-08-24T16:53:07+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या ३ महिन्यात जेडीयू पक्षात मोठे फेरबदल झाले आहेत.
पटणा - बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी हालचाल झाली आहे. जेडीयूनं त्यांच्या राज्य कार्यकारणीत फेरबदल करत शनिवारी नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. पक्षाने जवळपास १५ महिन्यापूर्वी २६० सदस्यांची जम्बो टीम असलेली कार्यकारणी बनवली होती मात्र आता ती भंग करून छोटी कार्यकारणी बनवण्यात आली आहे. नव्या कार्यकारणीत १० उपाध्यक्ष, ४९ महासचिव, ४६ सचिव, ९ प्रवक्ते आणि एका कोषाध्यक्षाचा समावेश आहे. पक्षाने जवळपास १८५ नेत्यांना कार्यकारणीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
शनिवारी सकाळी नितीश कुमारांच्या जेडीयूने जुनी कार्यकारणी भंग करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यासोबत राजकीय सल्ला देण्यासाठी बनवण्यात आलेली सल्लागार समितीही भंग केली आहे. त्यानंतर काही तासांतच नव्या कार्यकारणीची घोषणा झाली. ज्यात जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. २३ मार्च २०२३ रोजी जेडीयूने २५१ सदस्य असलेली प्रदेश कार्यकारणी जाहीर केली होती. त्यात २० उपाध्यक्ष, १०५ महासचिव, ११४ सचिव, ११ प्रवक्ते यांचा समावेश होता. त्यानंतर आणखी काही पदाधिकाऱ्यांना कार्यकारणीत संधी देत ही संख्या २६० इतकी करण्यात आली. सामान्यत: राज्य कार्यकारणीचा कार्यकाळ हा ३ वर्षाचा असतो परंतु अवघ्या १५ महिन्यात जेडीयूने ही कार्यकारणी बरखास्त केली आहे.
अनेकांना दाखवला बाहेरचा रस्ता
नव्या कार्यकारणीत जुन्या चेहऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. माजी मंत्री रंजू गीता, लक्ष्मेश्वर राय, जय कुमार सिंह, खुर्शीद उर्फ फिरोज आलम, वीरेंद्र प्रताप सिंह, श्यामबिहारी प्रसाद, माजी आमदार अशोक कुमार, मुजाहिद आलम, लखन ठाकूर यांच्यासह २० नेत्यांना उपाध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्याचप्रकारे १०५ महासचिवांपैकी बहुतांश जणांना काढले. आता केवळ ४९ महासचिव असतील. माजी आमदार मंजीत सिंह यांसारख्या नेत्यांनाही दूर करण्यात आले आहे.
प्रभुनाथ सिंह यांचा मुलगा रणधीर सिंह बनला महासचिव
नवीन उपाध्यक्षांमध्ये रवींद्र प्रसाद सिंह, माजी मंत्री मुनेश्वर चौधरी, अजित चौधरी, माजी खासदार महाबली सिंह, माजी आमदार हारूण रशीद, आमदार संजय सिंह, प्रमिला कुमारी प्रजापती, अमर कुमार अग्रवाल, वैद्यनाथ सिंह, कलाधर मंडल यांच्या नावाचा समावेश आहे. तर राजद सोडून जेडीयूत आलेले माजी आमदार रणधीर सिंह यांना महासचिव बनवण्यात आले. रणधीर सिंह हे बाहुबली माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांचे पुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत राजदनं तिकीट न दिल्याने त्यांनी जेडीयूत प्रवेश केला.