तुम्ही आधी खाली बसा, नियम शिकून घ्या; नितीश कुमारांचा विधीमंडळात रौद्रावतार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 06:54 PM2021-03-08T18:54:07+5:302021-03-08T19:00:31+5:30
आरजेडी सदस्य ऐकत नाही म्हटल्यावर रौद्रावतार घेत आधी नियम शिकून या, असा हल्लाबोल नितीश कुमार यांनी केला.
पाटणा :बिहार विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू असताना प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान नितीश कुमार (Nitish Kumar) विधान परिषदेत उपस्थित राहिले होते. यावेळी राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांवर नितीश कुमार यांनी जोरदार निशाणा साधला. आरजेडी सदस्य ऐकत नाही म्हटल्यावर रौद्रावतार घेत आधी नियम शिकून या, असा हल्लाबोल नितीश कुमार यांनी केला. (cm nitish kumar get angry over rjd mlc subodh rai in bihar legislative assembly)
मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. यावेळी काँग्रेस सदस्य प्रेमचंद मिश्रा यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री नितीश कुमार त्या प्रश्नांना उत्तरे देत होते. तेव्हाच राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य सुबोध राय यांनी पूरक प्रश्न विचारला. सुबोध राय यांची पद्धत नितीश कुमार यांना खटकली. नितीश कुमार उत्तर देत असूनही सुबोध राय यांनी प्रश्नांचा भडीमार सुरूच ठेवला. मग मात्र नितीश कुमार संतापले आणि तुम्ही आधी खाली बसा, नियम शिकून या, या शब्दांत सुबोध राय यांना खडे बोल सुनावले.
नितीश कुमारांचा रौद्रावतार
आम्ही बोलत आहोत. तेव्हा तुम्ही मध्ये मध्ये बोलणार का? ही काय पद्धत झाली का? मी काहीतरी येथे सांगतोय, तुम्ही ऐकूनच घेणार नाही का? असे केले तर कसे होणार? नियमांचे पालन करायला शिका. तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल आम्हांला आक्षेप नाही. मात्र, नियमांचे पालन करायलाच हवे. ज्यांनी प्रश्न विचारला, त्यांनाच पूरक प्रश्न विचारण्याचा प्रथम अधिकार असतो, अशा शब्दांत नितीश कुमार यांनी भर सभागृहात संताप व्यक्त केला.
सुबोध राय यांचा पलटवार
नितीश कुमार यांच्यावर वक्तव्यावर आक्षेप घेत सुबोध राय यांनी पलटवार केला आहे. सत्तापक्षाच्या सदस्यांनी ५-५ पूरक प्रश्न विचारले, तर काही कुणाची हरकत नसते. मात्र, विरोधी पक्षांनी पूरक प्रश्न विचारले की, सरकारला का खटकते? असा सवाल सुबोध राय यांनी उपस्थित केला.