CM नितीश कुमारांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:41 PM2023-11-08T13:41:38+5:302023-11-08T13:42:43+5:30
आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले, 'मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो
नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात नितीश यांनीही जाहीर माफी मागितली आहे. मात्र, आता राष्ट्रीय महिला आयोगाने नितीश कुमार यांच्या वक्तव्याची दखल घेत थेट विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आयोगाने केली आहे.
आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले, 'मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो.", असे म्हणत त्यांनी विधानसभेतील विधानावर माफी मागितली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन आता राजकारण तापलं आहे. भाजपाच्या महिला नेत्यांनी नितीश कुमार यांची गाडी अडवून नारेबाजी केली तर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसींनीही नितीश कुमार यांच्या विधानावरुन टीका केली आहे. आता, महिला आयोगाने या विधानाची दखल घेतली.
National Commission for Women writes to Bihar Legislative Assembly Speaker urging for action against CM Nitish Kumar over his derogatory remarks and expunging of his remarks from Assembly records pic.twitter.com/7BE0s3QFsZ
— ANI (@ANI) November 8, 2023
राष्ट्रीय महिला आयोगाने बिहार विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना पत्र लिहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विधानसभेतील विधानाची तपासणी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोग १९९० च्या कलम १० अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे पत्र लिहून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, नितीश कुमार यांच्या विधानाचा निषेधही केला आहे.
काय म्हणाले होते नितीश -
बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (७ नोव्हेंबर) चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते, "बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल."