राजधानीतील लाडक्या बहिणींना मिळणार २५०० रु.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 06:35 IST2025-03-09T06:35:27+5:302025-03-09T06:35:45+5:30
या माध्यमातून महिला सुरक्षा व समृद्धी साधण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य

राजधानीतील लाडक्या बहिणींना मिळणार २५०० रु.
नवी दिल्ली: आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी दिल्लीत 'महिला समृद्धी योजना' लागू केल्याची घोषणा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शनिवारी केली. या योजनेत संबंधित महिलांना मासिक २,५०० रुपयांची मदत थेट बँक खात्यावर दिली जाणार आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासाठी ५,१०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, यात कपिल मिश्रा, आशिष सूद आणि प्रवेश वर्मा यांचा समावेश आहे. नोंदणीसाठी लवकरच एक पोर्टल लाँच करण्यात येणार असून, यात योजनेशी संबंधित अटी व शर्ती नमूद असतील. या माध्यमातून महिला सुरक्षा व समृद्धी साधण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे.
आश्वासनाची पूर्तता
गेल्या महिन्यात झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान भाजपने जाहीरनाम्यात महिलांना मासिक २,५०० रुपये मदत देण्याची घोषणा जाहीरनाम्यात केली होती. पूर्वी सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीने २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. या योजनेच्या माध्यमातून भाजपने आखलेली रणनीती यशस्वी ठरली आणि विधानसभेत भाजपला ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळाला होता. या माध्यमातून २७ वर्षानंतर भाजपने दिल्लीत सत्ता मिळवली.