हिंसक आंदोलनाला मुख्यमंत्रीच जबाबदार; शिवसेनेचा संसदेत आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:05 AM2018-07-25T00:05:56+5:302018-07-25T00:06:26+5:30
मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचारासाठी शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले.
नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचारासाठी शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले. लोकसभेत सेना खासदार विनायक राऊत यांनी मराठा आंदोलनाचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अयशस्वी ठरल्याची आगपाखड केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांनी राऊत यांचीच रि ओढली. राज्यसभेत छत्रपती संभाजी राजेंनी मराठा समुदायाचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन सूचना केल्या.
औरंगाबादमध्ये एका युवकाने आत्महत्या केली. त्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, आरक्षणाच्या मगाणीकडे केवळ न्यायालयाची ढाल करून राज्य सरकार टोलवाटोलवी करीत आहे. आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा आम्ही जलसमाधी घेणार, असे पत्र मराठा आंदोलकांनी प्रशासनाला दिले होते. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळेच आताचे आंदोलन चिघळल्याचा थेट आरोप राऊत यांनी केला. महाडिक म्हणाले, मराठा समाजाच्या मागणीचा विचार झाला नाही. आंदोलकांनी इशारा देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने, युवकाने जलसमाधी घेतली.
संभाजीराजेंनी मराठीत भाषण केले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने भावना तीव्र झाल्या आहेत. आंदोलन चिघळले आहे. संभाजीराजेंनी दोन सूचना केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समजातील सर्व घटकांना बोलवून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सर्व राजकीय पक्षांशी त्यासाठी चर्चा करावी, असे पर्याय त्यांनी सुचविले.