तेलंगणातील ११ लाख शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; शेतकरी कर्जमाफी योजना सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 12:16 AM2024-07-19T00:16:15+5:302024-07-19T00:25:07+5:30
Telangana : राज्य सचिवालयात आयोजित कार्यक्रमात रेड्डी यांनी काही शेतकऱ्यांना धनादेश सुपूर्द केले. काही शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चाही केली.
हैदराबाद: तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी शेतकरी कर्जमाफी योजनेचा शुभारंभ केला. पहिल्या टप्प्यात या योजनेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ६,०९८ कोटी रुपये जमा करण्यात आले. राज्य सचिवालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी काही शेतकऱ्यांना धनादेश सुपूर्द केले. काही शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चाही केली.
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ११ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी बँकेला ६,०९८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. कृषी कर्जमाफी योजना तीन टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १.५ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज जुलै अखेरीस माफ केले जाईल, तर तिसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ऑगस्टमध्ये माफ केले जाईल, असे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ३१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून ती ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाईल. तसेच, मागील भारत राष्ट्र समिती (BRS) सरकारने दोन टर्म सत्तेत असूनही शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन योग्यरित्या राबवले नाही, असा आरोप मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी केला. मागील सरकारच्या काळात घेतलेल्या सात लाख कोटींच्या कर्जावर काँग्रेस सरकार दरमहा जवळपास सात हजार कोटी रुपये व्याज देत असल्याचा दावा मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी केला.
याचबरोबर,लोकसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२२ मध्ये तेलंगणातील जाहीर सभेत आणि नंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २०२३ मध्ये राज्यातील एका मेळाव्यात दिलेल्या आश्वासनानुसार काँग्रेस सरकार कर्जमाफी सुरू करत आहे, असे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी म्हणाले. तसेच, लवकरच दिल्लीला जाणार असून राहुल गांधी यांना या महिन्याच्या अखेरीस राज्यात होणाऱ्या जाहीर सभेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करणार आहे, कारण त्यांचे आभार व्यक्त करता येईल, असेही मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितले.