CoronaVirus: गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 05:06 PM2021-04-13T17:06:05+5:302021-04-13T17:08:38+5:30

CoronaVirus: कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या शेकडो भाविकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

cm tirath singh rawat says corona will not spread in kumbh and do not compare with markaz | CoronaVirus: गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा

CoronaVirus: गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा

Next
ठळक मुद्देगंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही - रावतकुंभ आणि मरकज यांची तुलना करणे चुकीचे - रावत१५ लाख भाविकांनी केले शाहीस्नान

डेहराडून: संपूर्ण देशभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली असून, कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या शेकडो भाविकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी अजब दावा केला आहे. गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही, असे रावत यांनी म्हटले आहे. (tirath singh rawat says corona will not spread in kumbh and do not compare with markaz)

मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत पत्रकारांशी बोलत होते. गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही. कारण गंगा नदी अविरतपणे वाहत असते. गंगा मातेचे आशीर्वाद घेऊन कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जावे, असा अजब दावा तीरथ सिंह रावत यांनी केला आहे. तसेच कुंभमेळ्याची तुलना मरकजशी करू नये. असे करणे चुकीचे आहे, असेही रावत यांनी स्पष्ट केले. 

राज्यात लॉकडाऊनची शक्यता, कोरोनाची गंभीर परिस्थिती; राज्यपालांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

१५ लाख भाविकांनी केले शाहीस्नान 

सोमवती अमावास्येला शाहीस्नानासाठी लाखो भाविकांनी कुंभमेळ्यात सहभाग घेतला होता. सकाळी ८ वाजेपर्यंत १५ लाख भाविकांनी शाहीस्नान केले असून, समाप्तीपर्यंत सुमारे ३५ लाख भाविक शाहीस्नान करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरे शाही स्नान पार पडले. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात कोरोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 

दरम्यान, उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्यातील १८ हजार १६९ भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यात १०२ साधू आणि भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. इतर राज्यांपाठोपाठ उत्तराखंडमध्येही रुग्णवाढ होताना दिसत आहे. राज्यात २ हजार ५६ रुग्ण उपचार घेत असून, शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला ३८६ नवीन रुग्ण आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला. कुंभमेळ्यात आढळून आलेल्या करोना पॉझिटिव्ह भाविकांमुळे राज्य सरकारबरोबर केंद्राचीही चिंता वाढली आहे.
 

Web Title: cm tirath singh rawat says corona will not spread in kumbh and do not compare with markaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.