CM योगी आदित्यनाथांची कारवाई; उत्तर प्रदेशात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 10:44 PM2023-11-18T22:44:08+5:302023-11-18T22:44:31+5:30
योगी सरकारने हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. राज्यातील काही कंपन्या हलाल सर्टिफिकेशनच्या नावावर डेअरी प्रोडक्ट, कापड, साखर, स्नॅक्स, मसाले आणि साबण इत्यादी उत्पादनांची विक्री करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. ही बाब मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली आहे.
बेकायदेशीरपणे 'हलाल सर्टिफिकेट' देण्याच्या काळ्या धंद्यावर उत्तर प्रदेशात बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर शनिवारी बंदीचा आदेशही जारी करण्यात आला. आदेशानुसार, हलाल प्रमाणपत्रासह खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्रीवर तत्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणी दोषी आढळल्यास, संबंधित व्यक्ती/कंपनीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
दुग्धजन्य पदार्थ, साखर, बेकरी उत्पादने, पेपरमिंट ऑइल, तयार पेये आणि खाद्यतेल यांसारख्या उत्पादनांच्या लेबलवर हलाल प्रमाणपत्राचा उल्लेख असल्याची माहिती अलीकडेच राज्य सरकारला मिळाली होती. एवढंच नाही तर काही औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि कॉस्मेटिक उत्पादनांच्या पॅकिंग/वलेबलिंगवरही हलाल प्रमाणपत्र चिन्हांकित केल्याचे समोर आले. औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित उत्पादनांच्या लेबलवर हलाल प्रमाणपत्र चिन्हांकित करण्याची तरतूद नाही.
कोणत्याही औषध, वैद्यकीय उपकरण किंवा कॉस्मेटिकच्या लेबलवर हलाल प्रमाणपत्राशी संबंधित बाब छापणे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. या संदर्भात गेल्या शुक्रवारी लखनौ आयुक्तालयात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. एफआयआरनुसार, हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई, जमियत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट दिल्ली, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया मुंबई, जमियत उलेमा महाराष्ट्र मुंबई इत्यादींनी विशिष्ट धर्माच्या ग्राहकांना त्यांची विक्री वाढवण्यासाठी धर्माच्या नावाखाली बेकायदेशीर हलाल प्रमाणपत्रे दिली.
हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय?
इस्लामिक धर्मशास्त्रात ज्या गोष्टींना हराम घोषित करण्यात आले आहे, त्या गोष्टी निषिद्ध आहेत, तर ज्या गोष्टी हलाल घोषित केल्या आहेत त्या करण्याची परवानगी आहे. इस्लामिक विश्वासांनुसार, हलाल अन्नपदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेत आणि प्राण्यांच्या कत्तलीला लागू होते. हलाल प्रमाणित म्हणजे विशिष्ट उत्पादन इस्लामिक विश्वासांनुसार तयार केले गेले आहे. अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर 'हलाल प्रमाणित' असा शिक्का लावतात.