लोकसभा निवडणुकीत भाजपचा सर्वात मोठा विजय होणार; CM योगी आदित्यनाथ यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 07:34 PM2023-02-05T19:34:34+5:302023-02-05T19:34:44+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.
लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत (LokSabha Election) मोठा दावा केला आहे. नेटवर्क18 चे संवाद साधताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, '2024 मध्ये भाजपला 2019 पेक्षाही जास्त जागा मिळतील आणि उत्तर प्रदेशातही भाजप रेकॉर्ड कायम ठेवेल.' याशिवाय त्यांनी देशाच चर्चा होत असलेल्या इतर मुद्द्यांवरही भाष्य केले.
यावेळी योगी आदित्यनाथ यांना विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर योगी म्हणाले की, '2019 च्या लोकसबा निवडणूकीतही विरोधक एकत्र आले होते, पण भाजपने त्यांचा निभाव लागू दिला नाही. आताही तेच होईल आणि भाजप पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करेल.' यावेळी योगींनी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली. 'सरसंघचालकांनी जे म्हटले, ते अगदी योग्य आहे. आपल्याला भारतीय दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. प्रत्येक भारतीयाने जात-धर्माचा विचार न करता स्वत:ला भारतीय नागरिक मानले पाहिजे,' असं योगी म्हणाले.
काय म्हणाले मोहन भागवत?
काही दिवसांपूर्वी आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले होते की, 'भारतातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही. भारतात इस्लामला कोणताही धोका नाही. पण त्यांना आपला दृष्टिकोन थोडा बदलावा लागेल. आम्ही मोठे आहोत, आम्ही राजे होतो, आता आम्हाला पुन्हा राजे व्हायचे आहे. हा विचार सोडून द्यावा लागेल.'
चित्रपट निर्मात्यांनी भावना समजून घ्याव्यात
यावेळी योगांनी बॉयकॉट ट्रेंडवरही भाष्य केले. 'आम्ही सर्व कलाकार, लेखक किंवा निर्मात्यांचा आदर करतो. उत्तर प्रदेशने चित्रपटांसाठी स्वत:चे धोरण बनवले आहे. अनेक चित्रपटांची निर्मितीही इथे होत आहे. पण, चित्रपट दिग्दर्शकाने हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी मुद्दाम अशी दृश्ये ठेवू नयेत ज्यामुळे वाद निर्माण होईल आणि लोकांच्या भावना दुखावल्या जातील.'