“आता कोणतीही भीती नाही ना?”; योगींनी घेतली हिंदू कुटुंबीयांची भेट, कैरानात झाली घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 02:53 PM2021-11-08T14:53:02+5:302021-11-08T14:53:48+5:30
उत्तर प्रदेशमधील कैराना येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हिंदू कुटुंबीयांची भेट घेतली.
कैराना: उत्तर प्रदेशमधील कैराना येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हिंदू कुटुंबीयांची भेट घेतली. या कुटुंबीयांनी कैराना येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यामुळे घरं-दारं सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन वास्तव केले होते. मात्र, आता यातील काही हिंदू कुटुंबीयांची घरवापसी झाली आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ कैराना येथे गेले होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी एका कुटुंबातील लहान मुलीला आता कोणतीही भीती नाही ना, अशी विचारणा केली. यावर त्या मुलीने नकारार्थी मान हलवली.
कैराना येथून काही व्यापारी कुटुंबीयांनी गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागातून पलायन केले होते. मात्र, आता या कुटुंबीयांची घरवापसी झाली आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सुरक्षिततेसंदर्भात आश्वस्त केले. येथील काही कुटुंबे कैराना सोडून दिल्ली, हरियाणा आणि गुजरात या भागात स्थायिक झाले होते, अशी माहिती मिळाली आहे.
बहुतांश कुटुंबीयांची घरवापसी
या पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यावर योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या भागात आधी गुंडाराज होता. मात्र, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. अनेकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, असे सांगत पीडित हिंदू कुटुंबांची भेट घेणे गुन्हा आहे का, अशी विचारणा योगी आदित्यनाथ यांनी केली. तसेच कैराना येथे आता पीएसी तैनात केले जाणार आहेत. कैराना भागातील बहुतांश कुटुंबे पुन्हा आपल्या गावी परत आली आहेत, असे आदित्यनाथ म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी सुमारे २० मिनिटे या कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि मंत्री सुरेश राणा उपस्थित होते.
दरम्यान, सन २०१५ ते २०१७ या कालावधीत सुमारे ९० हिंदू कुटुंबीयांनी कैराना भागातून पलायन केले होते. घराबाहेर विक्रीसाठी घर उपलब्ध आहे, असे फलकही लावण्यात आले होते. तत्कालीन भाजप खासदार हुकुम सिंह यांनी याबाबत आवाज उठवला होता. तर, आता उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्यामुळे पलायन केलेली कुटुंबे आता परतली आहेत, असा दावा योगी सरकारकडून केला जात आहे.