साधुंच्या हत्येवरून योगी आदित्यनाथ यांचं शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 08:15 AM2020-04-29T08:15:20+5:302020-04-29T08:15:47+5:30
बुलंदशहरमधील साधुंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांना फोन केला होता
लखनऊ: पालघरपाठोपाठ उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दोन साधुंची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यावरुन आता राजकारण सुरू झाल्याचं दिसत आहे. साधुंच्या हत्येचं राजकारण न करता कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका केली. या प्रकरणी कठोर कारवाई करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फोनदेखील केला होता. आता योगींनी ट्विट करून शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
उत्तर प्रदेशची चिंता करू नका. महाराष्ट्र सांभाळा, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं. योगी है तो न्याय है असा हॅशटॅग आदित्यनाथ यांनी वापरला. यानंतर बराच वेळ हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. पालघरप्रमाणे बुलंदशहरमध्ये झालेल्या साधुंच्या हत्येचं राजकारण करू नका, असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे भाजपाला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयानं ट्विट्सच्या माध्यमातून शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
बुलंदशहरमधील एका शिवमंदिराच्या परिसरात परवा रात्री दोन साधुंची निर्घृण हत्या झाली. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं. बुलंदशहरमधील हत्यांचं संबंधितांनी राजकारण करू नये, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं. त्यावर 'संजय राऊतजी, संतांच्या निर्घृण हत्येबद्दल चिंता व्यक्त करणं राजकारण वाटतं का? पालघरमध्ये हत्या झालेले साधू निर्मोही आखाड्याशी संबंधित होते. त्यामुळेच उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. आता विचार करा, राजकारण कोण करतंय,' असं योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयानं ट्विटमध्ये म्हटलं.
आदित्यनाथ यांच्या कार्यालयानं बुलंदशहर हत्याकांड प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहितीदेखील ट्विटरच्या माध्यमातून दिली. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. इथे कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. बुलंदशहर प्रकरणातही त्वरित कारवाई झाली आणि अवघ्या काही तासांत आरोपी पकडला गेला. महाराष्ट्र सांभाळा. उत्तर प्रदेशची चिंता करू नका,' असं जोरदार प्रत्युत्तर योगींच्या कार्यालयाकडून शिवसेनेला देण्यात आलं.