Lakhimpur Kheri Incident: “पुराव्याशिवाय कोणालाही अटक होणार नाही”; लखीमपूरवरुन योगी आदित्यनाथ यांनी सोडले मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 04:22 PM2021-10-09T16:22:51+5:302021-10-09T16:23:46+5:30
Lakhimpur Kheri Incident: कोणावरही अन्याय होणार नाही. मात्र, विरोधकांचा दबाव आहे म्हणून कारवाईही केली जाणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
लखनऊ: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी घटनेवरून (Lakhimpur Kheri Incident) योगी सरकार आणि मोदी सरकारविरोधात अद्यापही विरोधक आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दखल घेत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना योगी सरकारवर नाराजी व्यक्त केली. यातच आता या एकूणच प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडले असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुराव्याशिवाय कोणालाही अटक करण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. (cm yogi adityanath on lakhimpur kheri incident)
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपवर विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत आहे. शेतकरी नेत्यांनी योगी सरकारला इशारा देत, लखीमपूर खिरी प्रकरणी अटक करण्यात आली नाही, तर देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. एकूणच प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे.
लखीमपूर खिरीची घटना दुर्दैवी आणि दुःखद
एका वृत्तवाहिनीशी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, लखीमपूर खिरी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. सरकार या घटनेच्या मूळापर्यंत जात आहे. लोकशाहीत हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. सर्वांना सुरक्षित ठेवण्याची हमी कायद्याने दिली आहे. असे असताना कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच कोणत्याही दबावाखाली येऊन कोणतीही कारवाई केली जाणार नाही. पुराव्याशिवाय कोणालाही अटक केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
पीडितांच्या कुटुंबाला भेट देणारे सद्भावनादूत नव्हते
विरोधकांना लखीमपूर घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊ न दिल्याबाबत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधकांमध्ये असलेले मित्र सद्भावना दूत म्हणून तेथे जात नव्हते. त्यातील अनेक जण या हिंसाचारात सामील असल्याचा संशय होता. या घटनेतील तथ्य समोर आल्यावर चित्र स्पष्ट होईल. आम्ही दूध का दूध आणि पानी का पानी केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार योगी आदित्यनाथ यांनी बोलून दाखवला.
विरोधक हिंदू आणि शीख समुदायात मतभेद निर्माण करू इच्छितात
विरोधी पक्षातील नेते हिंदू आणि शीख समुदायामध्ये मतभेद निर्माण करून शत्रूत्वाची दरी तयार करू पाहत आहेत. म्हणूनच डोळे उघडे ठेवून या सर्व गोष्टींकडे पाहा. विरोधकांच्या मागे लपलेला त्यांचा खरा चेहरा जनतेने पाहावा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केले. गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतेय का, यावर बोलताना ते म्हणाले की, कोणताही व्हिडिओ यासंदर्भातील नाही. आम्ही नंबर जाहीर केले आहेत. कुणाकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते द्यावेत. कोणावरही अन्याय होणार नाही. मात्र, विरोधकांचा दबाव आहे म्हणून कारवाईही केली जाणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.