आपत्तीत संधी! योगी आदित्यनाथ दीड लाख प्रवासी मजुरांना देणार जॉबचं ऑफर लेटर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 01:32 PM2020-06-16T13:32:25+5:302020-06-16T13:33:40+5:30
सरकारकडून सर्व सवलती मिळाल्यानंतर आता यास गती मिळणे अपेक्षित आहे.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आपत्तीतील संधी' या आवाहनाना प्रतिसाद देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील मोठ्या संख्येने आलेले स्थलांतरित मजूर आणि कामगारांचे कौशल्य ओळखून त्यांना रोजगाराची संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुमारे दीड लाख प्रवासी मजूर व कामगारांना नोकरीची ऑफर देणार आहेत.
संबंधित कौशल्याची ओळख पटल्यानंतर कामगारांना ऑफर लेटर देण्यात येणार आहे. ज्यांना आज ऑफर लेटर मिळेल त्या सर्वांना वस्त्रोद्योगासह रिअल इस्टेट क्षेत्रात काम मिळेल. कोरोनाच्या संकटापायी रिअल इस्टेट क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरकारकडून सर्व सवलती मिळाल्यानंतर आता यास गती मिळणे अपेक्षित आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गादरम्यान लॉकडाऊनच्या वेळी राज्यातून परत आलेल्या परप्रांतीय कामगार आणि मजुरांची संख्या लाखोंमध्ये आहे. योगी आदित्यनाथ सरकार त्यांच्या कौशल्याच्या जोरावर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे दीड लाख स्थलांतरित मजूर आणि कामगारांना रोजगार ऑफर लेटर देणार आहे. त्यांना एमएसएमई सेक्टर आणि रिअल इस्टेटमधून हे रोजगार उपलब्ध होणार आहेत. लखनौ येथे होणारा हा कार्यक्रम सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग व एंटरप्राइझेस प्रमोशन विभागानं आयोजित केला आहे. आज ज्या स्थलांतरित कामगारांना नोकरीसाठी ऑफर लेटर देण्यात येतील त्यांना नोएडाच्या वस्त्रोद्योग क्षेत्रात काम मिळेल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितले की, मनरेगा अंतर्गत 57 लाख 12 हजार मजुरांना काम मिळाले आहे. ही संख्या सध्या देशात सर्वाधिक आहे. यानंतर सर्व औद्योगिक युनिटचे सर्वेक्षण करून या युनिटमधील रोजगाराची संधी लक्षात घेऊन मागणीनुसार मनुष्यबळ पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. परत आलेल्या मजूर व कामगारांचे पुन्हा स्थलांतर होऊ नये, म्हणून प्रत्येकाला त्यांच्या योग्यतेनुसार, अनुभवानुसार व क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. यासाठी एक्सप्रेस वे, मेडिकल कॉलेज, विद्यापीठ, रस्ते बांधकाम, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
अकुशल कामगार रोजगारामध्ये उत्कृष्ट
कोरोना व्हायरस आपत्तीच्या विचित्र परिस्थितीतही अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात उत्तर प्रदेश अव्वल ठरलं आहे. सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, सध्या उत्तर प्रदेशमध्ये 5712975 अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात राष्ट्रीय स्तरावरील 18 टक्के उत्तर प्रदेशाचा वाटा आहे.
हेही वाचा
CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली