CoronaVirus: लोकसंख्या चौपट असूनही 'या' राज्याची कामगिरी ब्रिटनपेक्षा भारी?; पाहा आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 03:25 PM2020-04-15T15:25:06+5:302020-04-15T15:29:13+5:30
coronavirus ब्रिटनच्या तुलनेत कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या अतिशय कमी
लखनऊ: कोरोना संकटासमोर युरोपमधल्या देशांनी अक्षरश: हात टेकल्याचं पाहायला मिळतं आहे. इटली, स्पेन आणि ब्रिटनची अवस्था अतिशय गंभीर आहे. यातल्या ब्रिटन आणि उत्तर प्रदेशची तुलना सध्या आकडेवारीच्या माध्यमातून केली जात आहे. ब्रिटनसारखा विकसित देश रोखू न शकलेलं संकट भारतासारख्या विकसनशील देशातल्या उत्तर प्रदेश राज्यानं रोखल्याचा दावा करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशचं क्षेत्रफळ ९३ हजार ९३३ चौरस मैल इतकं आहे. तर ब्रिटनचं क्षेत्रफळ ९३ हजार ६२८ चौरस मैल इतकं आहे. ब्रिटनची लोकसंख्या जवळपास ६.६ कोटी इतकी आहे. तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या २३ कोटींच्या घरात म्हणजेच ब्रिटनपेक्षा चौपट आहे. ब्रिटनमधल्या आरोग्य सुविधा अतिशय विकसित आहेत. तर उत्तर प्रदेशातल्या सोयी तितक्याशा चांगल्या नाहीत. मात्र तरीही ब्रिटनच्या तुलनेत उत्तर प्रदेशातल्या कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या अतिशय आहे.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत ३ लाख ८२ हजार ६५० जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातल्या ९३ हजार ८७३ जणांना कोरोना झाल्याचं निदान झालं आहे. म्हणजेच जवळपास २५ टक्के व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. ब्रिटनमध्ये आतापर्यंत १२ हजार १०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या १३ टक्के ब्रिटिश नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
उत्तर प्रदेशात बुधवार सकाळपर्यंत १६ हजार ७२० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ७०५ जणांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. याचा अर्थ तपासणी करण्यात आलेल्या केवळ ४.२ टक्के जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत केवळ ८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. टक्केवारीचा विचार केल्यास उत्तर प्रदेशातला मृत्यूदर केवळ १ टक्का इतका आहे. मात्र उत्तर प्रदेशातली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना तपासण्या होणं गरजेचं आहे.