Yogi Adityanath : योगी आदित्यनाथांनी दिवाळीनिमित्त जनतेला दिलं थेट होळीपर्यंतचं गिफ्ट; केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 07:13 PM2021-11-03T19:13:50+5:302021-11-03T19:14:52+5:30
योगी म्हणाले, 31 वर्षांपूर्वी अयोध्येत रामभक्त आणि कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता. आता पुढच्या वेळी, जेव्हा कारसेवा होईल तेव्हा, भगवान राम आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांवर गोळ्या नव्हे, तर फुलांचा वर्षाव केला जाईल.
अयोध्या - दीपोत्सवानिमित्त अयोध्येत पोहोचलेल्या सीएम योगींनी (CM yogi) मोठी घोषणा केली आहे. कोरोना काळात सुरू झालेली मोफत रेशन योजना आता होळीपर्यंत वाढविण्यात आली आहे. सीएम योगींच्या या निर्णयाचा यूपीतील 15 कोटी जनतेला फायदा होणार आहे. गहू आणि तांदळा व्यतिरिक्त सीएम योगींनी मोफत रेशन योजनेअंतर्गत डाळ, तेल आणि मीठ देण्याचाही निर्णय घेतला आहे. (Yogi Adityanath extended the free ration scheme till holi )
दिवाळीच्या एक दिवस आधी अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री योगी आले होते. ते म्हणाले, कोरोना काळात सुरू करण्यात आलेली PMJKY मोफत रेशन योजना होळीपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 15 कोटी लोकांना दर महिन्याला मिळेल. दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री योगीनी केलेल्या या घोषणेमुळे लोक खूश झाले आहेत.
कोरोना काळात सुरू झालेल्या या रेशन वितरणाअंतर्गत 122 लाख मेट्रिक टन खाद्यान्न वाटण्यात आले आहे. यूपी सरकारकडून 2339556.740 मेट्रिक टन, तर पीएमजीकेएवायअंतर्गत 9853889.085 मेट्रिक टन रेशनचे वाटप करण्यात आले आहे. राज्यात जवळपास 33705755 रेशन कार्ड धारक आहेत. राज्य सरकारने 80 हजार स्वस्तधान्य दुकानांच्या मदतीने प्रत्येक गरीब आणि निराधार लोकांपर्यंत रेशन पोहोचवले आहे.
31 वर्षांपूर्वी रामभक्तांवर आणि कार सेवकांवर करण्यात आला होता गोळीबार -
दीपोत्सवाच्या कार्यक्रमात सीएम योगींनी पूर्वीच्या सरकारांवरही जोरदार निशाणा साधला. योगी म्हणाले, 31 वर्षांपूर्वी अयोध्येत रामभक्त आणि कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता. जय श्री रामची घोषणा आणि राम मंदिराच्या समर्थनार्थ आवाज उठविणे गुन्हा मानला जात होता. मात्र, आता पुढच्या वेळी, जेव्हा कारसेवा होईल तेव्हा, भगवान राम आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांवर गोळ्या नव्हे, तर फुलांचा वर्षाव केला जाईल. राम मंदिराच्या उभारणीबाबत सीएम योगी म्हणाले, 2023 पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल.