महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सीएम योगींची खुर्ची जाणार; अखिलेश यादवांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:22 IST2024-11-11T17:21:00+5:302024-11-11T17:22:19+5:30
यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनीदेखील असाच दावा केला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सीएम योगींची खुर्ची जाणार; अखिलेश यादवांचा मोठा दावा
Akhilesh Yadav on Yogi Adityanath : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत एक मोठे भाकीत केले आहे. सोमवारी कुंडरकी येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना अखिलेश म्हणाले की, युपी सरकार आपली खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दिल्लीश्वरांनी ठरवले की, महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री योगींची खुर्ची हिसकावली जाणार आहे.
सीएम योगींवर निशाणा साधत अखिलेश म्हणाले की, योगी आदित्यनाथ स्वत:साठी दिल्लीला गेले होते, त्यांना खुर्ची वाचवायची होती, पण काही करता आले नाही. मी तुम्हाला खात्री देतो की महाराष्ट्रात भाजपचा पराभव होईल आणि यूपीमध्ये योगींची खुर्ची हिसकावून घेतली जाईल, अशी टीका अखिलेश यांनी केली. दरम्यान, यापूर्वी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सीएम योगी यांच्याबाबत अशीच भविष्यवाणी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन महिन्यांत योगी आदित्यनाथ यांना यूपीच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवले जाईल, असे ते म्हणाले होते.
कुंडरकीमध्ये यावेळी कडवी स्पर्धा
हाजी रिझवान यांच्या समर्थनार्थ अखिलेश कुंडार्की येथे पोहोचले होते. येथे 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. यावेळी येथील स्पर्धा चुरशीची आहे. सपाने हाजी रिझवानला येथून उमेदवारी दिली आहे. तर, भाजपकडून ठाकूर रामवीर सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय रफतुल्ला हे बसपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाने आपला उमेदवार उभा केला आहे.