CoronaVaccine: कोरोना लसीसाठी 'या' अॅपवर रजिस्टर करावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 11:06 AM2020-12-09T11:06:20+5:302020-12-09T11:32:40+5:30
Corona Virus Vaccination Co-WIN App: को-विन अॅपमध्ये लसीकरण प्रक्रियेपासून प्रशासनाचे काम, लसीकरण कर्मचाऱ्यांची तसेच ज्यांना लस द्यायची आहे त्यांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनचाही पर्याय असणार आहे.
कोरोना व्हायरसची लस लवकरच भारतात दिली जाणार आहे. केंद्राची तातडीने, आपत्कालीन परवानगी मिळविण्यासाठी तीन कंपन्यांनी अर्ज केले आहेत. ब्रिटन, अमेरिका, बहारीन, रशियामध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. यामुळे भारतातही लवकरच लसीकरणाची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. आता ही लस कशी दिली जाणार, कोण कोण लाभार्थी ठरणार, टप्पे, वितरण आदी प्लॅनिंग सुरु असताना अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. अशावेळी सरकारने लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक अॅप विकसित केले आहे, जे लसीकरणावर नजर ठेवणार आहे.
या अॅपचे नाव आहे Co-WIN. हे Co-WIN App मोफत डाऊनलोड करता येणार आहे. मात्र, सध्या हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध नाहीय. यामुळे डाऊनलोड करता येणार नाहीय. अशाप्रकारचे अॅप कुठेही आढळल्यास ते डाऊनलोड करू नका. ते फेक असू शकते शिवाय तुमचा डेटा हॅकर्सना मिळू शकतो. केंद्र सरकार या अॅपच्या लाँचची अधिकृत घोषणा करणार आहे. या अॅपबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
को-विन अॅपमध्ये लसीकरण प्रक्रियेपासून प्रशासनाचे काम, लसीकरण कर्मचाऱ्यांची तसेच ज्यांना लस द्यायची आहे त्यांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनचाही पर्याय असणार आहे. ग्राम पंचायत सरपंच देखील त्याच्या गावातील लोकांच्या लसीकरणासाठी या अॅपद्वारे अर्ज करू शकणार आहे.
भारतात लसीकरण तीन टप्प्यांमध्ये केले जाईल. आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन सेवा कर्मचारी असे दोन टप्पे आहेत. याची माहिती गोळा करण्याचे काम राज्य सरकारांना देण्य़ात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात कोरोना लस ही गंभीर आजारांशी लढणाऱ्या लोकांना दिले जाणार आहे. या सर्वांचे Co-WIN अॅपवर रजिस्ट्रेशन होणार आहे.
कसे काम करेल?
को विन अॅप पाच टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये प्रशासनिक मॉड्यूल, रजिस्ट्रेशन मॉड्यूल, लसीकरण, लाभ स्वीकृती मॉड्यूल, रिपोर्ट अशी पाच मॉड्यूल आहेत. रिपोर्टद्वारे लाभार्थीला आणि देणाऱ्यांना नोटिफिकेशन पाठविले जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे.