कोळशामुळे सर्वाधिक प्रदूषण, पण भारतात याचा वापर बंद होऊ शकत नाही; जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 06:32 PM2021-11-17T18:32:19+5:302021-11-17T18:33:57+5:30
भारतातील सुमारे दोनतृतीयांश वीजनिर्मिती कोळसा ऊर्जा प्रकल्पातून होते. एवढेच नाही तर देशातील लोकसंख्येचा मोठा वर्ग कोळसा उद्योगावर अवलंबून आहे.
नवी दिल्ली:जगातील हवामान बदल थांबवण्यासाठी जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व लवकरात लवकर कमी करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात मोठे आव्हान आहे ते कोळशाचा वापर, जो अजूनही चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये वीज निर्मितीसाठी मुख्य इंधन म्हणून वापरला जात आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा जीवाश्म इंधन उत्सर्जित करणारा देश आहे आणि कोळशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ग्लासगो हवामान परिषदेनंतर अनेक देशांवर जीवाश्म इंधनमुक्त होण्यासाठी दबाव वाढत असताना भारताचे कोळशावरचे अवलंबित्व संपवणे हे मोठे आव्हान आहे.
जीवाश्म इंधनावर पाश्चिमात्य देश
भारतासारख्या विकसनशील देशातील जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व दूर करणे सोपे नाही. शेकडो वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांती झाल्यापासून पाश्चिमात्य देशांनी जीवाश्म इंधन वापरुन जगाला प्रदूषित केले आणि विकसित देश बनले. आता तेच देश प्रदुषणाचे खापर विकसनशील देशांवर फोडत आहेत.
भारतातील कोळसा उद्योग
पाश्चिमात्य देश भारताला कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सांगत आहेत. अशा स्थितीत कोळशाचा वापर कमी करण्यावर भर दिला जातोय. कोळसा हा जीवाश्म इंधनाचा सर्वात वाईट प्रकार आहे, परंतु भारताच्या ऊर्जा उत्पादनात त्याचा वाटा 70 टक्के आहे. इतकेच नाही तर भारतातील पायाभूत सुविधाही नजीकच्या भविष्यात दुसऱ्या स्त्रोताकडे जाण्यास अजिबात तयार नाही.
काहींसाठी कोळसा जगण्याचे साधन
ब्रुकिंग्स संस्थेच्या एका रिपोर्टनुसार, भारतातील कोळसा उद्योगात सुमारे 4 दशलक्ष लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत. यापैकी बहुतेक कोळसा खाणी पूर्वेला आहेत, ज्यांना कोळसा पट्टा म्हणतात. या खाणी झारखंड, छत्तीसगड किंवा ओडिशामध्ये आहेत. या भागातील अर्थव्यवस्थेत कोळशाचे मोठे योगदान आहे आणि हा कोळसा काही स्थानिकांसाठी जगण्याचे साधन आहे.
मोठे संकट येईल
आंतरराष्ट्रीय दबावाखाली कोळसा उत्पादन बंद केले तर भारतातील अनेक लोक बेघर होतील. हजारो कुटुंबांवर आर्थिक संकट येईल. अनेक दशकांपासून खाणींमध्ये काम करुन हे लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. भारतात ऊर्जेची मागणी वाढत आहे. गेल्या दशकात कोळशाचा वापर दुपटीने वाढला आहे. भारताला अजूनही मोठ्या प्रमाणात कोळसा आयात करावा लागतो आणि येत्या काही वर्षांत अनेक खाणींमध्ये खाणकाम सुरू करण्याची योजना आहे. दरम्यान, भारतीय व्यक्ती अमेरिकन किंवा ब्रिटिश नागरिकांपेक्षा खूपच कमी वीज वापरतो.