कोळसा खाण कोेसळली; दहा मजुरांचा मृत्यू
By admin | Published: December 31, 2016 02:08 AM2016-12-31T02:08:20+5:302016-12-31T02:08:20+5:30
झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात कोळसा खाण कोसळून ११ मजुरांचा मृत्यू झाला असून, त्यात आणखी किमान ४0 ते ५0 जण ३00 फूट खाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांची
- एस. पी. सिन्हा, गोड्डा
झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात कोळसा खाण कोसळून ११ मजुरांचा मृत्यू झाला असून, त्यात आणखी किमान ४0 ते ५0 जण ३00 फूट खाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इस्टर्न कोलफिल्ड कंपनीच्या व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी रात्री कामाच्या वेळी अचानक खाण कोसळली आणि क्षणार्धात ३०० फूट खाणीचे मैदानात रूपांतर झाले.
गोड्डा जिल्ह्याच्या ललमटिया भागात भोडाय कोल माइन्स साइटवर गुरुवारी रात्री काही भाग ढासळला. ढिगाऱ्यातून काढलेल्या दहापैकी पाच मृतदेहांची ओळख पटली आहे. यातील एक जण झारखंडचा, तीन बिहारचे, तर एक जण उत्तर प्रदेशचा मजूर आहे. या खाणीत २० व्होल्वो, एक डोजर, सहा पोकलेन व्होल्वो, एक बोलेरो फसली आहेत.
या दुर्घटनेनंतर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मदतकार्य सुरू होण्यास उशीर झाला. या खाणीत दबले गेलेले सर्व मजूर एका खासगी कंपनीचे आहेत. ईसीएलने
खासगी कंपनीला उत्खननाचे काम सोपवले आहे. (वृत्तसंस्था)
क्षणार्धात सपाट
असे सांगण्यात येत आहे की, गुरुवारी रात्री कामाच्या वेळी अचानक खाण ढासळली आणि क्षणार्धात ३०० फूट खाण सपाट मैदानात परिवर्तित झाली. या घटनेनंतर कर्मचारी आणि मजुरांच्या कुटुंबातून संताप व्यक्त केला जात आहे.
इशाऱ्याकडे दुर्लक्ष : तीन दिवसांपूर्वीच या खाणीत उत्खननाचे काम सुरू करण्यात
आले होते. तत्पूर्वी, ईसीएलकडून या ठिकाणी पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा उत्खननास परवानगी देण्यात आली. एका इंजिनिअरने या खाणीत भेगा पडल्याची सूचना दिली होती; पण त्याकडे लक्ष देण्यात आले नाही.
कंपनीने घेतला नव्हता धडा
रात्री हेमनारायण यादव या कामगाराला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंदुआ गावातील वाहन चालक शहादत अंसारी यांनी सांगितले की, खाणीत जिथे ढिगारे कोसळले आहेत तिथे ड्रील मशीनही कोसळली आहे. कंपनीने यापूर्वीच्या घटनेतून धडा घेतला नाही आणि तसेच काम सुरू ठेवले.
मृतांच्या नातेवाइकांना
१२ लाखांची मदत
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १२ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. झारखंड सरकारकडून दोन लाख रुपये, तर महालक्ष्मी कंपनीकडून प्रत्येकी पाच लाख आणि ईसीएल कंपनीकडून पाच लाख रुपयांची मदत मिळणार आहे. जखमींना राज्य सरकारकडून २५ हजार रुपये मिळणार आहेत.
- केंद्रीय ऊर्जा आणि कोळसामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, मदतकार्य सुरू आहे. घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर गोयल यांनी गोड्डाच्या उपायुक्तांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी घटनास्थळी पाहणी केली. तपासात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
- झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, मी ललमटियाच्या पीडितांशी चर्चा केली. येथे ७० च्या आसपास लोक फसले आहेत. सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशी परिस्थिती राज्यात २० ते २५ जागेवर आहे. या ठिकाणीही कधीही अशी दुर्घटना होऊ शकते.