Coal Shortage: यंदाची दिवाळी अंधारात जाणार? भारतासह चीन, अमेरिका आणि युरोपवर संकट कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 08:09 IST2021-10-12T08:05:56+5:302021-10-12T08:09:40+5:30
Coal Shortage in India: केरळ, महाराष्ट्रच्या नागरिकांना वीज काळजीपूर्वक वापरण्याचं आवाहन केले जात आहे. भारत वीज संकटाच्या दिशेने जात आहे का? चीनप्रमाणे देशातील अनेक भागात अंधार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Coal Shortage: यंदाची दिवाळी अंधारात जाणार? भारतासह चीन, अमेरिका आणि युरोपवर संकट कोसळणार
नवी दिल्ली – देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे चिंता वाढली आहे. यंदाची दिवाळी अंधारात तर जाणार नाही ना? याची भीती व्यक्त केली जात आहे.
वीज संकटाचा धोका केवळ भारत नव्हे तर चीन, युरोप आणि अमेरिका इथंही निर्माण झालं आहे. त्यात ऑक्टोबर महिन्यात वीजेची मागणी वाढली आहे. दिल्ली, पंजाब, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक सरकारने बिघडत्या परिस्थितीवर केंद्राकडे बोट दाखवलं आहे. केरळ, महाराष्ट्रच्या नागरिकांना वीज काळजीपूर्वक वापरण्याचं आवाहन केले जात आहे. भारत वीज संकटाच्या दिशेने जात आहे का? चीनप्रमाणे देशातील अनेक भागात अंधार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
१३५ पैकी ११० प्रकल्पात कोळसा संकट
सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीच्या ७ ऑक्टोबरच्या रिपोर्टनुसार, देशात १३५ पैकी ११० प्रकल्पात कोळसा संकट(Coal Shortage) आलं आहे. १६ प्रकल्पात तर एक दिवसाचा कोळसा साठाही शिल्लक नाही. ३० प्रकल्पांकडे १ दिवसाचा कोळसा साठा आहे. तर १८ प्रकल्पात केवळ २ दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. म्हणजे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यात हरियाणा आणि महाराष्ट्र येथे ३ प्रकल्प आहेत. ज्यात एक दिवसाचाही कोळसा शिल्लक नाही. याचसह पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार येथे एक एक प्रकल्प आहेत जेथे १ दिवसाचा साठा आहे.
काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून सांगितलं आहे की, अचानक देशात पॉवर प्लांटमध्ये कोळसा संकटाची बातमी समोर आली आहे. एक खासगी कंपनी या संकटाचा फायदा उचलणार आहे का? याचा तपास कोण करणार? तर पेट्रोलनंतर आता वीज दरवाढीचं संकट लोकांवर येणार आहे. कोळसा संकट वाढलं आहे असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून सांगितले आहे.
परिस्थिती बिकट होतेय?
सर्वात पहिलं यूपीबाबत बोललं तर कोळसा संकटामुळे यूपीत विजेचा तुटवडा जाणवू लागला आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागातही विजेत कपात केली जात आहे. कागदोपत्री ४-५ तास विज कपात केली जातेय परंतु वास्तविक त्यापेक्षा अधिक भारनियमन करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातही वीज संकट उभं राहिलं आहे. यावर कॅबिनेट मंत्री प्रधुमन सिंह तोमर यांनी चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये कोळसा नाही तिथेही वीज संकट आहे असं प्रत्युत्तर मंत्र्यांनी दिलं आहे.
महाराष्ट्रात ७ थर्मल पॉवर प्लांटमध्ये १३ यूनिट ठप्प
केंद्र सरकारने दावा केला आहे की, वीज निर्मितीवर कुठलंही संकट नाही पण तसा बनाव केला जात आहे. परंतु हे सत्य आहे की, कोळसा संकटामुळे महाराष्ट्रातील ७ थर्मल पॉवर प्लांटमध्ये १३ यूनिट ठप्प झाली आहेत. राज्य सरकारने नॅशनल एक्सचेंजकडून पॉवर खरेदी करण्याची तयारी केली आहे. एकतर कोळसा नाही त्यात महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या बल्लापूर अंडर ग्राऊंड माइंसमधील जवळपास ८०० मजुरांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. याठिकाणी दिवसाला ३०० टन कोळसा उत्पादित करण्यात येतो. संपूर्ण देशात वीज संकट उभं राहिलं असताना येथील मजुरांनी वेतनवाढीची मागणी करत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
आणखी वाचा
कोळसासाठा पुरेसा, वीजटंचाई नाही, केंद्र सरकारचा दावा, अमित शहा यांच्याकडे झाली तातडीची बैठक