Coal Shortage: देशावर भीषण वीज संकट, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक; रेल्वे, कोळसा आणि ऊर्जामंत्री उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 02:16 PM2022-05-02T14:16:08+5:302022-05-02T14:16:43+5:30
Coal Shortage: तीव्र उष्णतेमुळे देशभरात वीजेचा मागणी वाढली आहे, पण कोळशाच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांत वीजपुरवठा खंडित होत आहे.
नवी दिल्ली: सध्या देशात भीषण वीज संकट उद्धवले आहे. यामुळे देशभरात घबराटीचे वातावरण आहे. वीज कपातीमुळे अनेकजण चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थनी महत्वाची बैठक बोलावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ऊर्जा मंत्री आरके सिंह, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी हेदेखील या बैठकीत उपस्थित आहेत.
अनेक प्रवासी गाड्या रद्द
तीव्र उष्णतेमुळे वीजेचा मागणी वाढली आहे, पण कोळशाच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांत वीजपुरवठा खंडित होत आहे. औष्णिक प्रकल्पांमध्ये कोळशाच्या तुटवड्यासाठी विरोधी पक्षांनी केंद्रावर आरोप केले आहेत. वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर कोळशाची वाहतूक वाढवण्यासाठी रेल्वेने आतापर्यंत सुमारे 50 प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि झारखंड या कोळसा उत्पादक राज्यांमधून ये-जा करणाऱ्या लोकांची गैरसोय होत आहे.
विजेच्या मागणीत वाढ
गेल्या सोमवारी विजेचा तुटवडा 5.24 GW होता, तो गुरुवारी 10.77 GW झाला. पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन (POSOCO) च्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी पीक पॉवर तूट फक्त 2.64 GW होती, जी सोमवारी 5.24 GW, मंगळवारी 8.22 GW, बुधवारी 10.29 GW आणि गुरुवारी 10.77 GW झाली. देशभरात कडाक्याच्या उन्हात गेल्या आठवड्यात तीन वेळा वीजपुरवठा विक्रमी पातळीवर पोहोचला. मंगळवारी सर्वाधिक वीज मागणी विक्रमी 201.65 GW वर पोहोचली. तर, गुरुवारी विजेची कमाल मागणी 204.65 GW च्या विक्रमी उच्चांकावर होती आणि शुक्रवारी 207.11 GW च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली.