एचपीत ३0 हजार कर्मचाऱ्यांना नारळ
By Admin | Published: September 22, 2015 01:00 AM2015-09-22T01:00:02+5:302015-09-22T01:00:02+5:30
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रमुख कंपनी हेवलेट पॅकार्ड (एचपी) ३0 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.
नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील प्रमुख कंपनी हेवलेट पॅकार्ड (एचपी) ३0 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. एचपीच्या भारतातील कर्मचाऱ्यांना या नोकरकपातीची झळ बसणार नसल्याचे कंपनीशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
जागतिक पातळीवरील जाणकारांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रातील गेल्या २१ वर्षांतील ही सर्वांत मोठी नोकरकपात ठरणार आहे. एचपीचे जगात ३ लाख कर्मचारी आहेत. सध्याच्या निर्णयानुसार, त्यातील सुमारे २८ हजार ते ३३ हजार कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढून टाकणार आहे.
एचपीकडून कर्मचारी कपात केली जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २0११ साली व्हाईटमन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा कर्मचारी कपात केली आहे. कंपनीच्या खर्चात कपात करण्याचा प्रभावी उपाय म्हणूनच कर्मचारी कपातीकडे पाहण्याचे धोरण कंपनीने स्वीकारले आहे. नवी कर्मचारी कपात अमलात आल्यानंतर गेल्या काही वर्षांत कंपनीने कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ८८ हजारांवर जाईल. औद्योगिक क्षेत्रात हाही एक विक्रमच मानला जात आहे.