प्रदूषणामुळे आकलनशक्तीची समस्या; संशोधकांच्या अभ्यासातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 09:57 AM2023-04-26T09:57:22+5:302023-04-26T09:57:36+5:30
इंग्लंडमधील संशोधकांच्या अभ्यासातील निष्कर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतातील खराब हवामानामुळे दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आकलनशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण, याच वयात मेंदूची वाढ होत असते, असे मत एका अभ्यासात व्यक्त करण्यात आले आहे.
अनुभूती ही विचार, अनुभव आणि इंद्रियांद्वारे ज्ञान आणि समज प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. संशोधकांनी सांगितले की, मुलांच्या दीर्घकालीन मेंदूच्या विकासावरील नकारात्मक परिणाम हा जीवनावर परिणाम घडवू शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियाचे प्रमुख संशोधक प्रोफेसर जॉन स्पेन्सर यांनी सांगितले की, वायू प्रदूषणाचा संबंध भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित आहे. त्याचा कुटुंबावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हवेतील अतिशय लहान कण ही एक मोठी चिंता आहे. कारण, ते श्वसनमार्गातून मेंदूमध्ये जाऊ शकतात. घरातील हवेच्या गुणवत्तेचा लहान मुलांच्या आकलनशक्तीवर कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी आम्ही ग्रामीण भारतातील कुटुंबांसोबत काम केले.
उत्तर प्रदेशात केला अभ्यास
या संशोधक टीमने लखनौ येथील कम्युनिटी एम्पॉवरमेंट लॅबसोबत काम केले. उत्तर प्रदेशातील ग्रामीण समुदायात शिवगढ येथे विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांसोबत काम केले. ई- लाइफ या नियतकालिकात याबाबतचा लेख प्रकाशित झाला आहे. यात २०१७ ते २०१९ या काळात २१५ मुलांचा अभ्यास करण्यात आला. स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गोवऱ्या वापरतात तिथे प्रदूषण अधिक असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.