फेक ट्रेनरमुळे मॉक ड्रिल प्रशिक्षण विद्यार्थिनीच्या बेतले जीवावर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 07:00 PM2018-07-13T19:00:39+5:302018-07-13T19:01:45+5:30
तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये आपातकालीन परिस्थितीत कसं बाहेर पडावं याचं प्रात्यक्षिक देत असताना एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोईम्बतूर - तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये आपातकालीन परिस्थितीत कसं बाहेर पडावं याचं प्रात्यक्षिक देत असताना एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोगेश्वरी असं या मुलीचं नाव असून ती कालाईमंगल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये बीबीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. मॉक ड्रिलदरम्यान लोगेश्वरी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्यास तयार नव्हती. मात्र ट्रेनरने जबरदस्तीने तिला खाली ढकललं यावेळी छताला डोकं आपटून तिचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. लोगेश्वरीला ढकलणारा ट्रेनर हा फेक असल्याचा माहिती आता समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (12 जुलै ) कॉलेजमध्ये आपातकालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना बाहेर कसं पडायचं याचे धडे दिले जात होते. यामध्ये विद्यार्थ्यांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचं प्रशिक्षण ट्रेनर देत होते. तसेच उडी मारणाऱ्या मुलांना झेलायला जाळी पकडून काही विद्यार्थीही खाली उभे होते. मात्र लोगेश्वरी उडी मारण्यासाठी तयार नव्हती. ती घाबरत असल्याचं पाहून ट्रेनर अरुमुगनने तिला मागून धक्का दिला आणि ती खाली कोसळली. याप्रकरणाची अधिक चौकशी केली असता अरुमुगन हा फेक ट्रेनर असल्याची बाब समोर आली आहे.
कॉलेज प्रशासनानेही हे प्रात्यक्षिक आमचं नसून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आयोजित केल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये लोगेश्वरीच्या डोक्याला यामध्ये गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी लोगेश्वरीला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र खासगी रुग्णालयाने तिच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याने तिला सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अरुमुगनला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.