महिलेच्या पोटातून काढली तब्बल 33.5 किलोची गाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 03:46 PM2018-10-12T15:46:22+5:302018-10-12T15:47:56+5:30
शस्त्रक्रियेची नोंद गिनीज बुकमध्ये होण्याची शक्यता
कोईंबतूर: एका महिलेच्या अंडाशयातून तब्बल 33.5 किलोची गाठ काढण्यात आली आहे. या महिलेची शस्त्रक्रिया यशस्वी होईल की नाही, याबद्दल डॉक्टरांना साशंकता होती. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला. याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होण्याची शक्यता आहे.
कोईंबतूरच्या एका रुग्णालयात वसंता यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ऊटीच्या रहिवासी असणाऱ्या वसंता यांच्या पोटातून तब्बल 33.5 किलोची गाठ काढण्यात आली. शेतमजूर असलेल्या वसंता यांच्या पोटाचा आकार काही महिन्यांपासून वाढत होता. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर वेदना सुरू झाल्यानं त्यांनी औषधं घेण्यास सुरुवात केली. वेदना कमी होत नसल्यानं वसंता जवळच्या डॉक्टरकडे गेल्या. त्यांनी अंडाशयात ट्युमर असल्याचं वसंता यांना सांगितलं. पोटातील गाठ मोठी असल्यानं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता कमी असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
पोटातील गाठ मोठी झाल्यानं त्यावेळी पोटात असह्य वेदना सुरू होत्या, असं वसंता यांनी सांगितलं. मला जेवणदेखील करता येत नव्हतं. इतकंच काय मला घरातील सहजसोपी कामंदेखील करता येत नव्हती, अशी माहिती वसंता यांनी शस्त्रक्रियेनंतर दिली. स्थानिक डॉक्टरनं शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्यानंतर वसंता कोईंबतूरमधील एका रुग्णालयात गेल्या. तिथे डॉ. सेंथिल कुमार, डॉ. पीयूष, डॉ. अनीता आणि डॉ. सतीश कुमार या टीमनं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. वसंता यांच्या अंडाशयातून 33.5 किलोची गाठ काढण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी 3 तास लागले.