उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला; दिल्ली गारठली, पंजाब - हरयाणातही तीव्र लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 03:19 AM2020-12-21T03:19:37+5:302020-12-21T07:04:53+5:30
cold : पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर येथे तापमान १.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. पंजाब व हरियाणा या दोन राज्यांतील सर्वात कमी तापमान आदमपूर येथे होते. उत्तरप्रदेश तसेच राजस्थानात सर्वत्र थंडीचे साम्राज्य आहे.
नवी दिल्ली : उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून, दिल्लीमध्ये पारा ३.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. श्रीनगरमध्ये यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. पंजाब व हरियाणामध्येही थंडीचा कडाका आणखी वाढला
आहे.
पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर येथे तापमान १.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. पंजाब व हरियाणा या दोन राज्यांतील सर्वात कमी तापमान आदमपूर येथे होते. उत्तरप्रदेश तसेच राजस्थानात सर्वत्र थंडीचे साम्राज्य आहे.
हवामान खात्याने सांगितले की, जम्मू-काश्मीर, लडाख आदींबरोबरच मध्य प्रदेशातही थंडीची लाट आली आहे. पंजाब, उत्तरप्रदेशमधील पूर्व भाग, उत्तराखंड, पश्चिम बंगालमधील हिमालयीन क्षेत्र, मेघालय, त्रिपुरा इथेही थंडीमुळे अनेक ठिकाणी दाट धुके पसरले आहे.
उत्तर भारतात येत्या आठवड्यात रात्री तापमान आणखी घसरेल. २० ते ३० डिसेंबर या कालावधीत वायव्य भारत, मध्य तसेच पूर्व भारतात किमान तापमान २ ते ६ अंश सेल्सिअस राहील.
काश्मीरमध्ये चिलई कलां कालावधीस आजपासून सुरुवात
काश्मीरमध्ये उद्या, सोमवारपासून चिलई कलां शीतकाळ सुरू होत आहे. या ४० दिवसांच्या कालावधीत काश्मीरमधील तापमान शून्य अंशाखाली जाते व थंडीचा कडाका खूपच वाढतो. तेथील पहलगाम व गुलमर्ग येथे थंडीची तीव्रता शनिवारी आणखी वाढली होती. हिमाचल प्रदेशातही अनेक ठिकाणी उणे तापमान आहे.