अधिवेशनाचा प्रारंभ गदारोळाने

By admin | Published: July 21, 2015 10:45 PM2015-07-21T22:45:42+5:302015-07-21T22:45:42+5:30

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात मंगळवारी प्रचंड गदारोळात झाली. राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी ललित मोदीप्रकरणी परराष्ट्र व्यवहारमंत्री

Cold start of the convention | अधिवेशनाचा प्रारंभ गदारोळाने

अधिवेशनाचा प्रारंभ गदारोळाने

Next

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात मंगळवारी प्रचंड गदारोळात झाली. राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी ललित मोदीप्रकरणी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि व्यापमं घोटाळ्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली; परंतु सरकारने विरोधकांची मागणी फेटाळून लावल्याने दिवसभर कामकाज ठप्प राहिले.
सरकारने स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळताना या मुद्यावर चर्चेची तयारी दर्शविली. पण आधी राजीनामा, मगच चर्चा या मागणीवर विरोधक अडून बसले. गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज चारदा तहकूब करावे लागले. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहरही गोंधळात वाहून गेला.
कुणीही राजीनामा देणार नाही. आम्ही समर्पणाच्या भावनेतून देशासाठी काम करीत राहू, तुम्ही अडथळे आणत राहा. तुम्हाला चर्चा करायची असल्यास आमची तयारी आहे, असे संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी स्पष्ट केले.
कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी आयपीएलचे फरार माजी आयुक्त ललित मोदी यांना स्वराज आणि राजेंनी केलेल्या मदतीचा मुद्दा उचलून धरला. पक्षाचे उपनेते आनंद शर्मा यांनी सरकारवर हल्लाबोल करताना मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्ती आदी आश्वासने दिली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेस सदस्यांच्या गोंधळातच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकार त्वरित या मुद्यावर चर्चेस तयार असल्याचे सांगितले. खुद्द सुषमा स्वराज या चर्चेला उत्तर देतील, अशीही ग्वाही त्यांनी दिली; परंतु काँग्रेसचे सदस्य सभापतींच्या आसनासमक्ष येऊन परराष्ट्रमंत्र्यांच्या बडतर्फीसाठी घोषणाबाजी करीत राहिले.
समाजवादी पार्टी आणि माकपनेही काँग्रेसच्या मागणीला पाठिंबा दिला. परराष्ट्रमंत्री तसेच राजस्थान, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावरील आरोपांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत तिघांनीही पदत्याग करावा, अशी मागणी माकप नेते सीताराम येचुरी यांनी केली.
उपसभापतींनी चर्चा सुरू करण्यास सांगितले; परंतु विरोधक चर्चेच्या मन:स्थितीत नव्हते.
माजी सदस्यांना श्रद्धांजली
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत, राज्यसभेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Cold start of the convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.