योगी सरकारने लाँच केले 'कोविड अॅप', लॉग इन केल्यानंतर मिळणार कोरोना रिपोर्ट
By ravalnath.patil | Published: September 21, 2020 09:34 AM2020-09-21T09:34:12+5:302020-09-21T09:37:07+5:30
हे अॅप ओटीपी (OTP) आधारित आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने कोविड अॅप लाँच केले आहे. त्यामुळे आता कोरोना बाधित रूग्णांना अहवाल मिळविण्यासाठी इकडे तिकडे फिरण्याची गरज भासणार नाही. या अॅपवर लॉग इन करून कोरोना रुग्णांना त्यांचा अहवाल मिळवता येणार आहे.
हे अॅप ओटीपी (OTP) आधारित आहे. कोरोना रुग्णाला आपला अहवाल पाहण्यासाठी या अॅपवर लॉग इन करावे लागेल. यासाठी लॉग इन करताना आपल्या फोनवर एक ओटीपी येईल. हा ओटीपीने अॅपमध्ये लॉग इन होईल. त्यानंतर कोरोना रुग्णाला त्याचा अहवाल पाहता येणार आहे.
या अॅपवर कोरोना अहवालाबद्दल सर्व सविस्तर माहिती मिळणार आहे. कोरोनाची टेस्ट केल्यानंतर येणारा अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. हे पाहण्यासाठी रुग्णालयात भेट देण्याची आवश्यकता नाही. आता या अॅपद्वारे कोरोना अहवाल मिळणार आहे.
दुसरीकडे, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता उत्तर प्रदेशातील शाळा व महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार नाहीत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सध्या शाळा व महाविद्यालये उघडण्याची परवानगी देता येणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. तर राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा उघडणे शक्य नाही, असे माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे सध्या राज्यातील शाळा-महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली नाही.
कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल
अमेरिकेला मागे टाकत भारताने कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत जगात अव्वल स्थान मिळवले आहे. 43 लाखांपेक्षा अधिक लोकांनी देशात कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे. जगभरातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येपैकी 19 टक्के संख्या ही भारतातील आहे. Worldometers नुसार, भारतानंतर कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत 18.70 टक्क्यांसह अमेरिकेचा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या स्थानी ब्राझील असून त्यांच्या रिकव्हरी रेट हा 16.90 टक्के आहे. त्यानंतर रशिया आणि दक्षिण अफ्रिका आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन कोटींवर
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल तीन कोटींवर गेला असून रुग्णांची संख्या 31,239,588 वर पोहोचली आहे. तर 965,065 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. दररोज 90 हजारांहून अधिक नवे रुग्ण हे आढळून येत आहेत. मात्र याच दरम्यान अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
आणखी बातम्या...
- काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन
- India Chine Faceoff : एलएसीवर तणाव सुरूच, दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची आज बैठक
- आजचे राशीभविष्य - २१ सप्टेंबर २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् मकरसाठी आनंदाचा दिवस