तरुणी अंघोळीसाठी बाथरुममध्ये जाताच घडलं भयंकर; गॅस गिजरने केला घात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 12:39 PM2024-01-15T12:39:06+5:302024-01-15T12:39:29+5:30
बेशुद्धावस्थेत असलेल्या मेघाला बाथरुममधून बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.
Gas Geyser Leak ( Marathi News ) : सोईसुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात यासाठी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात विद्युत उपकरणांचा वापर केला जातो. मात्र कधीकधी हीच उपकरणे माणसाच्या जीवावर उठतात. अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली असून बाथरुममध्ये अंघोळ करताना गॅस गिजरमुळे एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील बदायू इथं ही घटना घडली असून मेघा शर्मा असं मृत मुलीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदायू जिल्ह्यातील बुधबाजार येथील भूपालदास मेमोरियल डिग्री कॉलेजचे संस्थापक दिवगंत अरुण शर्मा यांची मुलगी मेघा शर्मा ही अकरावी इयत्तेत शिक्षण घेत होती. नुकतीच ती आपल्या आजी-आजोबांच्या घरी गेली होती. रविवारी दुपारच्या सुमारास ती अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली. मात्र बराच वेळ झाला तरी ती बाहेरच आली नाही. त्यामुळे तिचे आजोबा रामनिवास शर्मा यांनी घरातील कामगार महिलेला याबाबत विचारणा केली. त्यानंतर सदर महिला मेघाचा शोध घेत असताना बाथरुमचा दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं.
बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर तो उघडला न गेल्याने मेघाच्या आजोबांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर परिसरातील लोक धावून आले आणि त्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडला. त्यानंतर बेशुद्धावस्थेत असलेल्या मेघाला बाथरुममधून बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.
दरम्यान, या घटनेनं मेघाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.