भयंकर! "ऑनलाईन गेमिंगमुळे आयुष्य उद्ध्वस्त"; तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 05:39 PM2024-11-22T17:39:55+5:302024-11-22T17:41:18+5:30
कृष्णा राजकोटमधील कॉलेजमध्ये शिकत होता आणि अभ्यासात खूप हुशार होता.
ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने गुजरातमधील राजकोटमध्ये आणखी एका तरुणाचा जीव घेतला. २० वर्षीय कृष्णा पंडित याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या मोबाईलवरून एक सुसाईड नोट सापडली असून त्यात त्याने ऑनलाइन गेमिंग ॲप्सचं व्यसन हे त्याच्या मृत्यूचं कारण सांगितलं आहे.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. कृष्णा राजकोटमधील कॉलेजमध्ये शिकत होता आणि अभ्यासात खूप हुशार होता. सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिलं की, ऑनलाईन गेमिंगमुळे तरुण मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतात. माझ्या आत्महत्येद्वारे मी लोकांना एक संदेश देऊ इच्छितो की त्यांनी या व्यसनापासून दूर राहावं.
आपल्या मित्र प्रियांशला उद्देशून तरुणाने असंही लिहिलं की, माझी शेवटची इच्छा आहे की, ऑनलाईन जुगार कायमचा बंद झाला पाहिजे. त्याने 'स्टॅक' नावाच्या ऑनलाईन गेमिंग ॲपवर आपले सर्व पैसे गमावले आणि जगण्याची आशा संपली असं म्हटलं आहे. आपल्या मुलाच्या या व्यसनाची आपल्याला माहिती नसल्याचं तरुणाच्या वडिलांनी सांगितलं.
अशा घटना टाळण्यासाठी इतर पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं आणि सतर्क राहावं, असे आवाहन मुलाच्या वडिलांनी केलं. ऑनलाईन गेमिंग ॲप्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबाने सरकारकडे केली आहे. याप्रकरणी एसीपी राधिका भराई यांनी सांगितलं की, गांधीग्राम पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.