प्रेमपत्र देण्यास नकार दिल्यानं आठवीतील विद्यार्थ्याला जिवंत जाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 09:55 AM2018-07-09T09:55:01+5:302018-07-09T09:57:18+5:30
आरोपीला पोलिसांनी केली अटक
आंध्र प्रदेश: बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जिवंत जाळल्याची घटना आंध्र प्रदेशातील अरधावीडूमध्ये घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमपत्र देण्यास नकार दिल्यानं बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं हे पाऊल उचललं. यामध्ये पीडित मुलगा 90 टक्के भाजला असून त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.
या प्रकरणातील पीडित आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवीत शिकणारा पीडित मुलगा दुपारी जेवत असताना आरोपी तिथे आला. त्यानं त्याला दहावीत शिकणाऱ्या एका मुलीला प्रेमपत्र देण्यास सांगितलं. मात्र पीडित मुलानं नकार दिला. त्यानं प्रेमपत्र फाडून टाकत याबद्दलची तक्रार मुख्याध्यापकांना देण्याची धमकी दिली. यामुळे दोघांमध्ये वाद झाला.
प्रेमपत्र देण्यास नकार दिल्यानं बारावीत शिकणारा विद्यार्थी संतापला. त्यानंतर तो शाळेच्या पार्किंगमध्ये गेला. तिथून त्यानं एका दुचाकीतील पेट्रोल बाटलीत भरलं. यानंतर तो विद्यार्थी प्रेमपत्र देण्यास नकार देणाऱ्या मुलाकडे आला. त्यानं त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी याबद्दलची तक्रार पोलिसांना दिली आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.