कॉलेजियम सक्रिय, लवकरच बैठक
By admin | Published: November 1, 2015 11:57 PM2015-11-01T23:57:30+5:302015-11-01T23:57:30+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची लवकरच बैठक होणार असून, आठ उच्च न्यायालयांमधील मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची लवकरच बैठक होणार असून, आठ उच्च न्यायालयांमधील मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. २१ अतिरिक्त न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढविण्याची शिफारस कॉलेजियमने यापूर्वीच केली आहे.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुवाहाटी, गुजरात, पाटणा, पंजाब- हरियाणा तसेच राजस्थान उच्च न्यायालयांमधील नियमित न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या न्यायालयांचे कामकाज सध्या हंगामी मुख्य न्यायाधीशांमार्फत चालविले जात आहे. उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांचे पद रिक्त असल्यास किंवा ते कर्तव्य बजावू शकत नसल्यास राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अन्य न्यायाधीशाकडे ती जबाबदारी सोपविली जाते. सरकारने अलीकडेच काही उच्च न्यायालयांमध्ये हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करीत या तरतुदीचा वापर केला होता.
सहा महिने प्रक्रिया ठप्प
सर्वोच्च न्यायालय आणि २४ उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत १३ एप्रिल ते १६ आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या काळात कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नव्हती. सुधारित कायद्यानुसार राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (एनजेएसी) लागू करण्यासंबंधी अधिसूचना १३ एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती. गेल्याच महिन्यात १६ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा आयोग रद्दबातल ठरवत न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी जुनीच कॉलेजियम पद्धत योग्य ठरविली. एनजेएसी कायदा लागू झाल्यानंतरही प्रस्तावित पॅनलला काम करता येऊ शकले नाही. सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांनी त्याचा भाग बनण्यास नकार दिला होता.