शिमल्यात कर्नलने केला लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार, कर्नलला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 12:21 PM2017-11-23T12:21:19+5:302017-11-23T12:24:56+5:30
सैन्यातील कर्नलने लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शिमल्यात घडली आहे.
शिमला- सैन्यातील कर्नलने लेफ्टनंट कर्नलच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी शिमला पोलिसांनी आरोपी कर्नलला अटक केली. मुंबईत मॉडेलिंग क्षेत्रात काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत कर्नलने पीडित मुलीला भेटायला बोलावलं आणि दारु पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
पीडित तरुणी 21 वर्षांची असून तिचे वडील शिमला येथील सैन्याच्या प्रशिक्षण केंद्रात लेफ्टनंट कर्नलपदावर कार्यरत आहेत. तर आरोपी कर्नलसुद्धा त्याच प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे. 19 नोव्हेंबर रोजी कर्नलपदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने सहकारी लेफ्टनंट कर्नल आणि त्यांच्या मुलीला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. तुमच्या मुलीला मॉडेलिंगसाठी मुंबईत पाठवा, माझ्या ओळखीने तिला काम मिळवून देऊ, असं त्याने लेफ्टनंट कर्नलला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी आरोपी कर्नलने पीडित मुलीला व्हॉट्स अॅपवर तिचे फोटो पाठवायला सांगितले होते. मुंबईत राहणाऱ्या माझ्या मुलीला तुझे फोटो फॉरवर्ड करतो असं त्याने पीडित तरूणीला सांगितलं. फोटो पाठवल्यानंतर कर्नलने पीडितेला फोन केला आणि घरी भेटायला बोलावलं. मॉडलिंग क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्तींशी ओळख करुन देतो, असं आरोपी कर्नलने पीडित तरूणीला सांगितलं. पीडित तरुणी कर्नलच्या घरी पोहोचल्यावर कर्नलने तिला दारु पाजून तिच्यावर बलात्कार केला. कर्नलसोबत आणखी एक व्यक्तीही घटनास्थळी उपस्थित होता, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेबद्दल कुणालाही सांगितलं तर तुझ्या वडिलांचं करिअर उद्ध्वस्त करू, अशी धमकी कर्नलने दिल्याचा आरोप पीडित तरूणीने केला.
दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी पीडित तरुणी आणि तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असून आरोपी कर्नलला अटक करण्यात आली आहे. तर कर्नलच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. या गुन्ह्यातील कर्नलचा साथीदार कोण होता हे अजून स्पष्ट झालेलं नाही.