अतिरेकी हल्ल्यात सात जवान शहीद; आसाम रायफल्सच्या ऑफिसरची पत्नी, मुलगाही मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 08:00 AM2021-11-14T08:00:17+5:302021-11-14T08:01:34+5:30
राष्ट्रपती रामनाथ काेविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला.
इंफाळ : लष्कराच्या ४६ आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर विप्लव त्रिपाठी यांच्यासह त्यांची पत्नी आणि सहावर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ताफ्यातील ५ जवानांना वीरमरण आले. राष्ट्रपती रामनाथ काेविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. चुराचंदपूर जिल्ह्यात शेखन-बेहिआंग पाेलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी सुमारास हा हल्ला झाला.
‘पीआरपीके’वर संशय
मणिपूर येथील ‘पीपल्स रिव्हाॅल्युशनरी पार्टी ऑफ कंगलीपक’ या दहशतवादी संघटनेकडे संशयाची सुई आहे. मात्र, अद्याप काेणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. या भागात चार दहशतवादी गट सक्रिय आहेत. त्यांनी हल्ला केल्याचा मणिपूर पाेलिसांना संशय आहे.
दाेषींवर लवकरच कारवाई करू : संरक्षणमंत्री
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ट्वीट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, मला खूप दु:ख झाले आहे. सीओ व दोन जवानांसह देशाने पाच जवान गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. हल्ल्यातील दाेषींवर लवकरच कारवाई करू, असे राजनाथसिंह म्हणाले.
माेदींची श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. शहीद झालेले जवान व त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी ट्वीट करून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हल्ल्याचा निषेध करतानाच पंतप्रधानांवर टीका केली. देशाचे रक्षण करण्यास माेदी असमर्थ असल्याचे राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले आहे.