सियाचीनवर तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' याचं निधन; लष्कर, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
By जयदीप दाभोळकर | Published: January 1, 2021 03:54 PM2021-01-01T15:54:52+5:302021-01-01T16:01:13+5:30
कर्नल नरेंद्र कुमार यांना देशातील प्रतिष्ठित नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री आणि याव्यतिरिक्त अर्जून पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
जगातील सर्वात उंच भाग असलेल्या सियाचिन ग्लेशिअरवर भारताची स्थिती मजबूत करत तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' कुमार यांचं गुरूवारी निधन जालं. ते ८७ वर्षांचे होते. लष्कराकडून याबाबत माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्करानं नरेंद्र बुल यांना श्रद्धांजली वाहिली. १९८४ मध्ये ऑपरेसन मेघदूतच्या वेळी त्यांनी अनेक मोहिमा पार पाडल्या होत्या. तसंच सियाचिनमधील पाकिस्तानच्या कुरापती रोखण्याचं मोठं कामही त्यांनी केलं होतं.
कर्नल नरेंद्र कुमार यांच्या जन्म १९३३ मध्ये ब्रिटीशकालिन भारतील रावलपिंडी (सध्या पाकिस्तानात) येथे झाला होता. १९५० मध्ये ते भारतीय लष्करात दाखल झाले. तसंच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कुमाऊं रेजिमेंटमध्ये रूजू झाले. भारतीय लष्करात ते 'कुमार बुल' या नावाने प्रसिद्ध होते. सियाचीनवरील महत्त्वाच्या लष्करी ठाण्याला ‘कुमार बेस’ असं नाव देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. ३४ वर्षांच्या लष्करी सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यांना पद्मश्री, कीर्तिचक्र, अतिविशिष्ट सेवा पदक, तसेच अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
The Soldier Mountaineer#IndianArmy pays homage to Col Narendra ‘Bull’ Kumar – The Soldier Mountaineer who will continue to inspire generations. Colonel Narendra ‘Bull’ Kumar passed away today leaving behind a saga of utmost dedication, courage and bravery. pic.twitter.com/GSd65R6eBT
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) December 31, 2020
त्यांनी सर्वात उंच समजलं जाणाऱ्या नंदादेवी शिखरावर तिरंगा फडकावला होता. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी शोक व्यक्त केला. "कर्नल नरेंद्र 'बुल' कुमार (सेवानिवृत्त) यांनी अतिशय साहसानं आणि मेहनतीनं देशसेवा केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. सालतोरो रेंज आणि लडाखच्या अन्य प्रदेशांवरील भारतीय लष्कराचं असलेलं वर्चस्व हे कर्नल नरेंद्र कुमार यांच्या साहसी मोहिमांचाच भाग आहे. लष्कराच्या इतिहासात त्यांचं नाव कायमच स्मरणात ठेवलं जाईल, असा विश्वास रावत यांनी व्यक्त केला.