चेन्नईत विद्यार्थ्यांच्या हातावर जातीचा रंग
By admin | Published: November 4, 2015 02:04 PM2015-11-04T14:04:13+5:302015-11-04T15:43:47+5:30
जातीय भेदभाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच चेन्नईजवळील तिरुनलवेली येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हातावरच जातीय रंग दिसून येतो.
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ४ - जातीय भेदभाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच चेन्नईजवळील तिरुनलवेली येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हातावरच जातीय रंग दिसून येतो. विद्यार्थ्यांसाठी जातनिहाय रिस्ट बँड तयार करण्यात आले असून टिकली, रिबीन्सचा रंगही जातीनुसारच ठरवला जातो.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तिरुनवेली येथील सरकारी शाळेतील विद्यार्थी हातात रिस्ट बँड घालून येतात. प्रत्येक जातीसाठी एका विशिष्ट रंगाचा बँड दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातावरील बँडवरुन त्यांची जात ओळखता येते व मुलांना त्यांचा मित्र कोण व शत्रू कोण हे ओळखता येते. थेवर समाजासाठी लाल व पिवळा, नाडर समाजासाठी निळा आणि पिवळा, यादव समाजातील मुलांसाठी भगवा रंग असतो. तर दलित वर्गात येणा-या पल्लर समाजातील मुलांसाठी हिरवा व लाल, अरुधंतीयार समाजातील मुलांसाठी हिरवा, काळा व पांढ-या रंगाचा व्रिस्ट बँड घालून येतात.
ऑगस्टमध्ये तिरुनवेली येथे विद्यार्थ्यांमधील वाढत्या जातीय संघर्षावर अभ्यास करण्यात आला. यात रिस्ट बँडच्या आधारे विद्यार्थी एकमेकांवर हल्ले करत असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर जिल्हाधिका-यांनी शाळेत रिस्ट बँड घालण्यावरच बंदी घालण्याचे तोंडी आदेश दिले. पण यानंतर अद्याप लेखी आदेश काढण्यात आलेले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रिस्ट बँडसोबतच टिकली किंवा रिबीन्सचा वापरही सुरु झाला आहे असे एका विद्यार्थिनीने सांगितले.
तिरुनवेलीतील विद्यार्थ्यांमध्ये जातीय विष किती पसरले आहे याचे उदाहरणही एका मुख्याध्यापकाने दिले. काही दिवसांपूर्वी शाळेतील कनिष्ठ जातीच्या विद्यार्थ्यांने मोबाईलवर त्याच्या जातीतील गाणे लावले. यावर उच्च जातीच्या मुलांनी आक्षेप घेतला. या वादाला काही वेळाने हिंसक वळण लागले अशी आठवण मुख्याध्यापकांनी सांगितली. जातीय भेदाभेद संपुष्टात आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते लढा देत असताना दुसरीकडे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये आत्तापासून जातीयवाद बिंबवणा-या या प्रकारावर नाराजी व्यक्त होत आहे.