ही तर केजरीवाल यांच्या हत्येची रंगीत तालीम
By admin | Published: January 19, 2016 02:59 AM2016-01-19T02:59:58+5:302016-01-19T02:59:58+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर रविवारी झालेली शाईफेक ही त्यांच्या हत्येची रंगीत तालीम आहे आणि पुढच्या वेळी हे लोक शाईऐवजी बंदूक किंवा बॉम्ब घेऊन
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर रविवारी झालेली शाईफेक ही त्यांच्या हत्येची रंगीत तालीम आहे आणि पुढच्या वेळी हे लोक शाईऐवजी बंदूक किंवा बॉम्ब घेऊन येतील, असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. दरम्यान, केजरीवाल यांच्यावर शाई फेकणारी तरुणी भावना अरोरा हिला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे सुरक्षा व्यवस्थेतील कुचराईमुळे ही घटना घडल्याच्या आपच्या आरोपाचा दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी इन्कार केला.
केजरीवाल यांच्या कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्थेतील कुचराईमुळेच शाईफेकीची घटना घडल्याचा आरोप आशुतोष यांनी केला. या घटनेबाबत जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे. रविवारची ही शाईफेक केजरीवाल यांच्या हत्येची रंगीत तालीमच आहे, असे दिसते. पक्षाने केजरीवालांना अतिरिक्त सुरक्षा पुरविण्यास कधीही सांगितलेले नाही; परंतु त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे, असे आशुतोष म्हणाले.
दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी या शाईफेकप्रकरणी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली आणि सुरक्षा व्यवस्थेतील कुचराईमुळे ही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले. सुरक्षा व्यवस्थेतील कुचराईमुळे ही घटना घडल्याचा आपचा आरोप बिनबुडाचा आहे. केजरीवालांच्या सभास्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, असे बस्सी यांनी सांगितल्याचे समजते. (वृत्तसंस्था)