जी-२० संमेलनासाठी वाहतूक पोलिसांची रंगीत तालीम; १० हजार पोलिस कर्मचारी करणार तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 07:47 AM2023-09-03T07:47:57+5:302023-09-03T07:48:08+5:30
दिल्लीकरांच्या दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम होणार नाही, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.
- सुनील चावके
नवी दिल्ली : जी-२० देशांच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी येत असलेल्या जगातील अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्यांची शनिवारी दिल्लीच्या विविध रस्त्यांवर तसेच प्रगती मैदानाच्या भारत मंडपम येथे पूर्ण रंगीत तालीम घेण्यात आली. या संमेलनादरम्यान वाहतूक नियंत्रण करण्यासाठी दहा हजार पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी ८:३० ते १२ वाजेपर्यंत, दुपारी ४:३० ते ६ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ७ पासून रात्री ११ पर्यंत तीन टप्प्यांमध्ये रंगीत तालीम घेण्यात आली. सकाळी इंडिया गेटभोवतीचे सहा रस्ते, मथुरा रोड, भैरोमार्ग, रिंग रोड, जनपथ, कर्तव्यपथ, विवेकानंद मार्ग, बाराखंबा रोड, टॉलस्टॉय मार्ग, शांतीपथ, सत्य मार्ग, सरदार पटेल मार्ग, कौटिल्य मार्ग, पंचशील मार्ग या एनडीएमसी आणि नवी दिल्लीतील मार्गांवर रंगीत तालीम घेण्यात आली.
दिल्लीतील वास्तव्यादरम्यान अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांची सुरक्षित आणि निर्वेध वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी नवी दिल्ली आणि एनडीएमसी भागात सर्व प्रकारची वाहतूक नियंत्रणाखाली असेल. पण त्यामुळे दिल्लीकरांच्या दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम होणार नाही, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.
८ ते १० सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी
शिखर संमेलनादरम्यान नागरिकांनी शेजारच्या शहरांतून दिल्लीत येण्या-जाण्यासाठी गुगल आणि मॅप माय इंडियाची मदत घ्यावी, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. जी-२० शिखर संमेलनासाठी ८ ते १० सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
या काळात केवळ भारत मंडपम म्हणजे प्रगती मैदानाशेजारचे सुप्रीम कोर्ट मेट्रो स्थानक बंद राहणार आहेत. शिखर संमेलनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मेट्रो रेल्वेने दिल्लीत कुठेही जाता येईल. पण अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक तसेच बस वाहतुकीसाठी मार्ग बदलण्यात आल्यामुळे वाहनांनी प्रवास करणे अवघड होणार आहे.