चार राज्यांत लसीकरणाची रंगीत तालीम, केंद्र सरकारची जय्यत पूर्वतयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 05:48 AM2020-12-26T05:48:18+5:302020-12-26T06:50:26+5:30
corona vaccination update : लस टोचल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीवर काही विपरीत परिणाम होत नाही ना, याकडे डॉक्टर लक्ष देतील.
नवी दिल्ली : देशात एखाद्या कोरोना लसीस आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यास जानेवारीमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन येत्या २८ व २९ डिसेंबरला पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात या चार राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून लसीकरणाची रंगीत तालीम केली जाणार आहे.
हा सराव करताना को-विन अॅपमध्ये लस घेणाऱ्याचे नाव नोंदवले जाईल. त्या संबंधित व्यक्तीला या अॅपच्या माध्यमातून लस टोचून घेण्याची वेळ, ठिकाण, दिवस कळविला जाईल. लस टोचण्यासाठी प्रत्येक केंद्रामध्ये विशिष्ट संख्येने कर्मचारी या रंगीत तालमीत
उपस्थित राहतील. ज्याला लस टोचली आहे, त्याला नंतर अर्धा तास एका खोलीत निरीक्षणाखाली ठेवले जाईल.
लस टोचल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीवर काही विपरीत परिणाम होत नाही ना, याकडे डॉक्टर लक्ष देतील. दिवसभरात किती लोकांना एका केंद्रामध्ये लस टोचण्यात आली, याची नोंदही को-विन अॅपच्या माध्यमातून ठेवली जाईल. लसीकरणाची रंगीत तालीम प्रत्येक राज्याच्या दोन जिल्ह्यांत पार पडेल. प्रत्येक जिल्ह्यात पाच ठिकाणी हा सराव केला जाईल.
येथे होणार सराव
- पंजाब
- आसाम
- आंध्र प्रदेश
- गुजरात
लसीची साठवणूक, वाहतुकीवरही लक्ष
केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, केवळ लोकांना लस टोचणे हीच गोष्ट नव्हेतर, लसीची शीतगृहांमध्ये साठवणूक करणे, त्या लसीची व्यवस्थित ने-आण करणे, या गोष्टीही नीट पार पडणे आवश्यक आहे. त्याकडेही रंगीत तालमीत विशेष लक्ष दिले जाणार आहे.
देशात केवळ २.८१ लाख सक्रिय रुग्ण
देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता अवघी २ लाख ८१ हजार इतकी उरली आहे. ९७ लाख १७ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.